Loksabha 2019 : शिरूर, मावळात 58 टक्के मतदान 

Loksabha 2019 : शिरूर, मावळात 58 टक्के मतदान 

पुणे : मतदानाच्या टक्केवारीत पुणे शहराचा कित्ता शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघानेही गिरवला आहे. पुण्याप्रमाणेच या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या टक्केवारीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येकी दोन टक्‍क्‍यांची घट झाली आहे. सोमवारी (ता. 29) झालेल्या निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात 58.04 टक्के, तर मावळमध्ये 58.21 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वर्तविला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांची निवडणूक संपल्याने, आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. यामुळे उद्यापासून (ता. 30) विकासकामे मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात, तर मावळमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या दोन्ही मतदारसंघात दोन्ही विद्यमान खासदारांच्या विरोधात नवखे आणि तरुण चेहरे निवडणूक रिंगणात असल्याने त्याचा लाभ कोणाला, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे. 

खासदार आढळराव पाटील सलग चौथ्यांदा, तर मावळचे खासदार बारणे हे सलग दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. शिरूरमधून 23 आणि मावळमधून 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मावळमधील पिंपरी, चिंचवड व पनवेल या तीन शहरी भागातील विधानसभा मतदारसंघापेक्षा मावळ, उरण व कर्जत या ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघात तुलनेने अधिक मतदान झाले आहे. शिरूरमध्येही हडपसर आणि भोसरी या शहरी भागातील विधानसभा मतदारसंघात ग्रामीण मतदारसंघांच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com