Vidhan Sabha 2019: वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच "फाइट'

पांडुरंग सरोदे 
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ग्रामीण, वस्त्यांच्या परिसरांमध्ये जादा मतदान झाले आहे. ही मते ज्याच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार विजयी होईल.

विधानसभा 2019 :
पुणे - वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच "फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान झाल्याने विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उमेदवारांना किमान लाखाचा टप्पा गाठावा लागेल. हे मतांचे गणित जुळवणाराच विजयी होणार आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घटला आहे. त्यामुळे तो कुणाच्या पथ्यावर पडणार, मतमोजणी दिवशी समजेल. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, अशी ओळख वडगाव शेरीची आहे; परंतु 2014 मध्ये भाजपच्या जगदीश मुळीक यांनी शिवसेनेचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा पाच हजार 300 मतांनी पराभव केला. भाजप, राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप, संभाजी ब्रिगेड हे पक्षही निवडणुकीत उतरले. मात्र, मुळीक विरुद्ध टिंगरे अशीच दुरंगी लढत आहे. टिंगरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. 

गेल्या वेळी टिंगरे यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली. नंतर पक्ष बदलून महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविली; परंतु माजी आमदार बापू पठारे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी मुळीक यांच्याशी घरोबा केला. त्यामुळे टिंगरे यांची ताकद आणखीनच कमी झाली. दुसरीकडे येथे भाजपचे 23-24 नगरसेवक आहेत. त्यातच आरपीआयची "व्होटबॅंक' मुळीक यांच्या पाठीशी राहण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचीही मते मुळीक यांच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. एमआयअम, वंचित बहुजन, बसप, आप, संभाजी ब्रिगेड यांच्याकडे काही प्रमाणात मतदार वळेल. मात्र, विजयासाठी उमेदवाराला लाखभर मते मिळवावी लागणार आहेत. 

गेल्या विधानसभेला दोन लाख 21 हजार 371 इतके मतदान झाले (54 टक्के) 2019 च्या लोकसभेला दोन लाख सहा हजार 181 जणांनी मतदान (46.42 टक्के) केले, तर या विधानसभेसाठी 46.92 टक्‍के मतदान झाले. त्यामुळे सात टक्के मतदान कमी झाले. दोन लाख 38 हजार 830 पुरुषांनी, तर दोन लाख 17 हजार 638 महिलांनी, 19 तृतीयपंथी मतदार, असे एकूण चार लाख 56 हजार 487 मतदार होते. त्यापैकी पुरुषांमध्ये 1 लाख 18 हजार 174, तर महिलांमध्ये 95 हजार 985 व तृतीयपंथी मतदार पाच, असे एकूण दोन लाख 14 हजार 164 जणांनी (46.92 टक्‍के) मतदान केले. त्यामध्ये महिला मतदारांनी निरुत्साह दाखविला आहे. त्यामध्येही ग्रामीण, वस्त्यांच्या परिसरांमध्ये जादा मतदान झाले आहे. ही मते ज्याच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार विजयी होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight between NCP and BJP in Wadgaon Sherry constituency

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: