विद्येच्या माहेरघरातच 'हेराफेरी'; पैसे घेऊन वाढवले विद्यार्थ्यांचे गुण!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

संबंधित विद्यापीठातील प्रमुख मूल्यांकन अधिकारी नामदेव कुंभार (रा. मॉडेल कॉलनी) यांनी या संदर्भात सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : शहरातील एका नामांकित अभिमत विद्यापीठातील 178 विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुण वाढवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित विद्यापीठाच्या दोन मूल्यांकन अधिकाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय​

संदीप हेंगळे (रा. गुलमोहोर अपार्टमेंट, नवश्‍या मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) आणि सुमीत कुमार (रा. गोल नाका, अंबरपेठ, हैदराबाद) असे या मूल्यांकन अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यापीठातील प्रमुख मूल्यांकन अधिकारी नामदेव कुंभार (रा. मॉडेल कॉलनी) यांनी या संदर्भात सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

'कुठं नेऊन ठेवलंय पुणं आमचं?'; महापालिकेतील सत्ताधारी भाजपला काँग्रेसचा खडा सवाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेंगळे, कुमार हे मूल्यांकन अधिकारी आहेत. दोघांनी 178 विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना गुणवाढ दिली. तसेच बनावट कागदपत्रे तयार केली. दोघांनी जादा गुण देण्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन केले. सप्टेंबर 2018 ते सप्टेंबर 2019 दरम्यान हा प्रकार घडला होता. हा प्रकार कुंभार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against two assessment officers of reputed university in Pune City