'कुठं नेऊन ठेवलंय पुणं आमचं?'; महापालिकेतील सत्ताधारी भाजपला काँग्रेसचा खडा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सात महिने उलटून गेल्यावर बैठका घेतात, त्यात ठोस घोषणा करीत नाहीत. खासदार गिरीश बापट, जावडेकर दोघे मिळून केंद्र सरकारकडून पुण्यासाठी जादा सुविधा मिळवू शकत नाहीत. अशावेळी या दोघांना पुणेकरांचे प्रतिनिधी असे का म्हणायचे?

पुणे : शहरामध्ये कोरोना साथीचा कहर झाला असून ते देशातील हॉटस्पॉट बनले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पक्षाच्या खासदार, आमदारांनी गेल्या सात महिन्यांपासून साथ आटोक्यात आणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. भाजपच्या निष्क्रीयतेमुळे पुणेकर संकटात सापडले. आता 'कुठे नेऊन ठेवले पुणे आमचे' असा खोचक सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला केला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी

शहराचे आरोग्य उत्तम राखणे हे कायद्यानुसार महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु त्यात महापालिकेने कुचराई केली आहे. महापालिकेत भाजपचे शंभर नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता ही पदे भाजपकडे आहेत, पण या पदाधिकाऱ्यांकडून स्टंटबाजी व्यतिरिक्त गांभीर्याने उपाययोजना झालेल्या नाहीत. राज्य सरकारने महापालिकेला दोन आरोग्य अधिकारी दिले. ऐन साथीच्या काळात ते रजेवर गेले. त्यांना रजेवर कसे जाऊ दिले? पालिकेवर कोणाचे नियंत्रण नाही का?

राज्य सरकारने जंबो केअर सेंटर बांधले, ते चालविण्यासाठी पुणे महापालिकेकडे सोपविले. महापालिकेच्या स्थायी समितीने अकार्यक्षम ठरलेल्या संस्थेला टेंडर काढून काम दिले. त्यातून गोंधळ झालाच. त्या सेंटरमध्ये उपचारांअभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. त्यासाठी भाजपलाच जबाबदार धरायला हवे. तसेच एका खाजगी कंपनीच्या सीएसआर फंडातून दळवी रुग्णालयाचे आधुनिकीकरण झाले. तिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण ते रुग्णालय आजमितीला वापरले जात नाही. ही भाजपचीच निष्क्रीयता आहे. डॉ. नायडू रुग्णालयात ऑक्सिजनची टाकी उभारायला हवी होती. ती साथीच्या काळात आवश्यक असूनही का उभारली गेली नाही? ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत असताना याकडे दुर्लक्ष का झाले? या निष्क्रीय कारभाराची किंमत पुणेकरांना मोजावी लागत आहे, असे जोशी यांनी पत्रकात खेदपूर्वक नमूद केले आहे.

दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय​

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यासाठी आठ कॉर्डीयक अॅम्ब्युलन्स दिल्या, पण पंतप्रधानांचे उजवे हात समजले जाणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सात महिने उलटून गेल्यावर बैठका घेतात, त्यात ठोस घोषणा करीत नाहीत. खासदार गिरीश बापट, जावडेकर दोघे मिळून केंद्र सरकारकडून पुण्यासाठी जादा सुविधा मिळवू शकत नाहीत. अशावेळी या दोघांना पुणेकरांचे प्रतिनिधी असे का म्हणायचे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि अन्य आमदार इतर गोष्टींचे राजकारण करत बसतात, पण पुण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. ही बाब चीड आणणारी आहे. प्रत्येक पुणेकर काळजीत आहे, अशा प्रसंगी जावडेकर यांनी ठाण मांडून प्रशासन हलवायला हवे होते, असेही जोशी म्हणाले.

पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी होणार 'स्मार्ट'

पुण्यात शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक, आयटी तज्ज्ञ आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले नामवंत डॉक्टर्स, औषधी क्षेत्रातील सल्लागार आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा अशावेळी करून घेणे गरजेचे आहे. त्यातही भाजपचे महापौर, खासदार, आमदार कमी पडले आहेत. त्यांच्याशी संवाद ही साधलेला नाही. पुणेकरांनी भाजपला भरभरून दिले, पण भाजपने बिकट प्रसंगात पुण्यासाठी काही केलेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे. 

साथीच्या काळात राजकारण करू नये याची जाणीव मलाही आहे, पण पुण्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे हाल आणि वेदना पाहून मी उद्विग्न झालो आहे, त्यामुळे मी ही भूमिका घेतली आहे, असे जोशी म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress criticized ruling BJP in PMC on the backdrop of rising corona in Pune