चित्रपटरसिकांसाठी जयकर बंगला खुला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जयकर बंगल्यात हे पाहता येईल
जुनी व दुर्मीळ छायाचित्रे, पोस्टर व चित्रपट
‘डिजिटल लायब्ररी’द्वारे चित्रपटाचा खजिना 
संगीतकार शंकर-जयकिशन यांचा शंभर वर्षे जुना पियानो
१९४०-१९९० मध्ये वापरलेला सिनेफोन १६ एमएम प्रोजेक्‍टर
३५ एमएमची चित्रपट रिळ

झाडे तोडण्यावर मौन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’साठी सिंहगड रस्त्यावरील झाडे तोडण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. पर्यावरणमंत्री असलेल्या जावडेकर यांना याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी संबंधित प्रश्‍नावर मौन बाळगले.

पुणे - बॅरिस्टर जयकर यांनी वास्तव्य केलेला जयकर बंगला हा पुण्याचे वैभव आहे. म्हणूनच हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. आता नव्या स्वरूपातील जयकर बंगला व त्यातील चित्रपटाशी संबंधित डिजिटल लायब्ररी चित्रपट अभ्यासक व रसिकांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत केंद्रीय सूचना व माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) आवारात असलेल्या जयकर बंगल्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते. ‘एनएफएआय’तर्फे याच बंगल्यामध्ये डिजिटल लायब्ररी साकारण्यात आली. या दोन्हींचे उद्‌घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी अभिनेते मोहन जोशी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम आदी उपस्थित होते.

या बंगल्यातून जयकरांचे व्यक्तिमत्त्व व त्यांचे पुणे विद्यापीठाशी असलेले नाते व्यक्त होते. त्यामुळेच नूतनीकरणास प्राधान्य देण्यात आले. नूतनीकरणानंतर हा बंगला आता पर्यटक, चित्रपटअभ्यासक व रसिकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ ठरेल, असेही जावडेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी बॅरिस्टर जयकर यांची पणती प्रसन्ना गोखले, त्यांची निहाल व वरुण ही मुले यांनी आवर्जून उपस्थिती लावली. ‘‘माझे पणजोबा उन्हाळ्याच्या सुटीमध्ये कायम या घरामध्ये राहायला येत. त्यांना हे घर खूप आवडत होते. 
अमेरिकेत राहणारी त्यांची तीन नातवंडे मागील वर्षी पुण्यात आली होती. त्या वेळी आम्ही सर्वांनी या घराला भेट दिली. तेव्हापासूनच नूतनीकरणाचे काम सुरू झाले, असे गोखले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film Public Jaykar Bunglow