पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दिवाळीपूर्वी लागणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

राज्यात १६ फेब्रुवारीला ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात पाच लाख ५१ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील एक लाख ३६ हजार ८२० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर तीन लाख ८१ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील ५७ हजार ५५७ पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा अंतरिम निकाल नऊ ऑक्‍टोबरला जाहीर करण्यात आला.त्यानंतर गुणपडताळणीसाठी मंगळवारपर्यंत मुदत दिली होती.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दिवाळीपूर्वी लागण्याची शक्यता आहे. तर जिल्हानिहाय गुणवत्ता यादी नोव्हेंबरमध्ये पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तसेच शाळांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यात १६ फेब्रुवारीला ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात पाच लाख ५१ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील एक लाख ३६ हजार ८२० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर तीन लाख ८१ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील ५७ हजार ५५७ पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा अंतरिम निकाल नऊ ऑक्‍टोबरला जाहीर करण्यात आला.त्यानंतर गुणपडताळणीसाठी मंगळवारपर्यंत मुदत दिली होती. मंगळवारी दुपारपर्यंत पाचवीच्या ८८७ आणि आठवीच्या ५५५ असे एकूण एक हजार ४४२ विद्यार्थ्यांचे अर्ज गुणपडताळणीसाठी आले आहेत. राज्य परीक्षा परिषदेने पडताळणीचे कामही सुरु केले आहे. आतापर्यंत जवळपास दिडशे अर्ज निकाली काढले असून पडताळणी दरम्यान त्यात कोणत्याही बदल झालेला नाही. सर्व अर्ज आणि आक्षेप तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निकालानंतर गुणवत्ता यादीही प्रसिद्ध होईल, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.

यंदा एप्रिलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. फेब्रुवारी २०२०मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. दरवर्षी साधारणत: ऑक्टोबरमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू होते. विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. एप्रिल २०२१ मध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सध्या सुरू असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा ऑनलाइन घेण्याचे कोणतेही नियोजन नाही. या परीक्षा ऑफलाइनच होणार असून परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.

शिष्यवृत्तीच्या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची आकडेवारी :
इयत्ता : परीक्षेसाठी नाव नोंदविलेले विद्यार्थी : परीक्षेला उपस्थित राहिलेले विद्यार्थी : पात्र
पाचवी : ५,७४,५७६ : ५,५१,०५६ : १,३६,८२०
आठवी : ३,९७,५२३ : ३,८१,७८३ : ५७,५५७ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The final results of the fifth and eighth scholarship exam will be declared before Diwali