हवाई दलाचे अखेर पालिकेसमोर ‘लँडिंग’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

सध्याच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पूर्वीच्याच जागेवरून सहाशे मिलीमीटर व्यासाची आणि दोनशे मीटर लांबीची वाहिनी हवाईदलाच्या जागेतून टाकून देण्याची विनंती उपमहापौरांनी केली. महापौरांनी केलेल्या या शिष्टाईला बैठकीत तात्काळ मान्यता मिळाली.

वडगाव शेरी : कोणतीही पूर्वकल्पना न देता लोहगावचे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी बंद करण्याच्या हवाईदलाच्या कृतीला जशास तसे उत्तर देत पुणे महापालिकेने हवाईदलाचे पाणी बंद केले होते. त्यामुळे कोंडी झालेल्या हवाईदलाने अखेर पुणे महापालिकेसमोर ‘लँडिंग’ करीत सांडपाणी वाहिनी टाकायला परवानगी दिली.

आज सकाळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत हवाईदलाच्या लोहगाव येथील मुख्यालयात हवाईदल अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी लोहगाव हवाईदल प्रमुख के व्ही एस नायर, हवाईदलाचे प्रशासकीय अधिकारी टी पी साहजी, एम ई एस विभागप्रमुख अनिल कुमार उपस्थित होते. बैठकीत सांडपाण्यामुळे लोहगावचे नागरिक आणि हवाईदलाच्या निवासी इमारतीत राहणारे रहिवासी या दोघांना कसे समस्यांना सामोरे जावे लागते याविषयी चर्चा झाली. 

सध्याच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पूर्वीच्याच जागेवरून सहाशे मिलीमीटर व्यासाची आणि दोनशे मीटर लांबीची वाहिनी हवाईदलाच्या जागेतून टाकून देण्याची विनंती उपमहापौरांनी केली. महापौरांनी केलेल्या या शिष्टाईला बैठकीत तात्काळ मान्यता मिळाली. पुढील तीन महिन्यात या वाहिनीला पर्यायी वाहिनी महापालिकेने स्वतःच्या जागेतून टाकण्याचे आणि त्यानंतर हवाई दलाच्या हद्दीतील वाहिनी बंद करण्याचे ठरले. 

त्यानुसार आज दुपारी सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. त्यामुळे लोहगावचे सांडपाणी वाहून जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. यासोबत हवाईदलाचा बंद केलेला पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन उपमहापौरांनी यावेळी दिले.

Web Title: Finally Air Force Landing infront of Corporation