लेटरबॉम्बवर अखेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपेंचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील "लेटर बॉम्ब'ची गंभीर दखल घेत राष्ट्र्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी निनावी पत्रातील सर्व आरोप खोडून काढले.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील "लेटर बॉम्ब'ची गंभीर दखल घेत राष्ट्र्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी निनावी पत्रातील सर्व आरोप खोडून काढले.

"सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना आणि बांधणी केली आहे. त्याच बळावर पक्ष टिकला, वाढला आणि सत्ताधाऱ्यांविरोधात लढत आहे.(ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) त्यामुळे राष्ट्रवादीला जातीयतेचे लेबल लावण्याचा प्रकार बालिशपणाचा आहे, अशा शब्दांत तुपे यांनी पत्र लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांचा समाचार घेतला. पुण्यातील पक्षाच्या कार्यकारिणीत जवळपास 60 टक्के पदाधिकारी हे इतर जाती-धर्माचे आहेत, हेही तुपे यांनी आकड्यांशी मांडले. त्याचवेळी पक्षाच्या विविध 21 पैकी 13 सेलचे अध्यक्ष हेही मराठा समाजाव्यतिरिक्त असल्याची यादी तुपे यांनी पत्रकार परिषदेत दाखविली. "ज्यांनी कोणी हे पत्र लिहिले, त्याला राष्ट्रवादीचा कॉंग्रेस पक्ष काय आहे ? हे त्याला कळेलच नाही, त्यातून आरोप करण्याचे धाडस झाल्याचा टोमणाही तुपे यांनी हाणला. 

राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर निनावी "लेटरद्वारे जोरदार आरोप करण्यात आले आहेत. "राष्ट्रवादी मराठ्यांचाच पक्ष' अशा आशयाचे पत्र लिहून पक्षाच्या एका कार्यकर्त्याने स्थानिक नेतृत्वावर जातीयवादाचा आरोप केला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष, खासदार, महापालिकेतील विरोधी पक्षनेता, सात विधानसभा अध्यक्ष आणि प्रमुख आघाड्यांचे अध्यक्षपदी मराठा समाजातील कार्यकर्त्यांची नेमणूक केल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यापलीकडे जाऊन पक्षाचे नेते अजित पवार, शहराध्यक्ष चेतन तुपे आणि अन्य माजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरही बोट ठेवले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या "लेटर बॉम्ब'ची पक्ष संघटनेत जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाची कार्यकारिणी, त्यावरील नेमणुका, त्याचा उद्देश, पक्षाचे धोरणे, कार्यपध्दती याचा तुपे यांनी पाढाच वाचला. 

तुपे म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कधीही जाती-धर्माचा विचार होत नाही. पुणे शहर राष्ट्रवादीची मूळ कार्यकारिणीही 130 पदाधिकाऱ्यांची आहेत. त्यौपकी 65 टक्के पदाधिकारी हे इतर जातीतील आहेत. शिवाय, सेलचे प्रमुखांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे याच घटकाचे आहे. त्यामुळे हा पक्ष मराठ्यांचाच आहे, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. केवळ राजकीय नैराश्‍याच्या भावनेतून पत्र काढण्यात आले आहे. जातीयतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांना हे पत्र पाठविण्यात आलेले नाही.'' 

"पुण्यात पवार यांनी "ओबीसी' घटकातील महिलांना महापौर, स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. खुल्या गटासाठी महापौरपद असताना शीख समाजातील मोहनसिंग राजापल यांना संधी दिली. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीनंतर सुभाष जगतापांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आले. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षही "ओबीसी' घटकातील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत केवळ मराठा समाजातील पदाधिकारी आहेत, हा आरोप खोटारडा आहे,'' याकडेही तुपे यांनी लक्ष वेधले. 

तुपे म्हणाले, "हे पत्र पक्षाध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविल्याचे सांगण्यात आले. मात्र एकाही वरिष्ठ नेत्यांपर्यंत ते पोचले नाही. त्याबाबत चर्चा केली असून, कार्यकारिणीची माहितीही वरिष्ठांना दिली आहे. त्यात कुठेही मराठ्यांना प्राधान्य असल्याचे दिसून आले नाही. पत्रातील बिनबुडाचे आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Disclosure From NCPs city president on letterbomb