पुणे : अखेर खंडणीप्रकरणी मंगलदास बांदलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये बांदल यांचा खंडणीच्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे निश्‍चित झाले होते. त्यानंतर शनिवारी खंडणी विरोधी पथकाने बांदल यांना अटक केली.

पुणे : सराफी व्यावसायिकाकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये मंगलदास बांदल यांना पुणे पोलिसांच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (ता.२१) अटक केली. बांदल यांचा खंडणी प्रकरणामधील सहभाग निश्‍चित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. बांदल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते, मात्र या प्रकरणानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदाशिव पेठेत राहणाऱ्या 42 वर्षीय सराफी व्यावसायिकाकडून तिघांनी व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत व पिस्तुलाचा धाक दाखवून 50 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाने आशिष पवार, रूपेश चौधरी व रमेश पवार यांना अटक केली होती, तर गुरुवारी रात्री फिर्यादीचा चालक संदेश वाडकर यास ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणामध्ये फिर्यादीच्या जबाबामध्ये बांदल यांच्या नावाचा चार वेळा उल्लेख आला आहे.

- आतापर्यंत २५०० प्रवाशांना करण्यात आलंय 'क्वारंटाईन'; पुण्याचे सर्वाधिक!

बांदल यांनी फिर्यादीची भेट घेऊन 'माझ्यावतीने रूपेश चौधरी हा सर्व काम पाहील' असे म्हटल्याचे जबाबामध्ये नमूद केले आहे. रूपेश चौधरी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. संदेश वाडकर हा फिर्यादीच्या आईच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता, त्यामुळे त्याचे फिर्यादीच्या घरी जाणे-येणे सुरू होते. व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेला कॅमेरा वाडकर यानेच लपविल्याची माहिती पोलिस तपासामध्ये पुढे आली. 

- Coronavirus : राज्यातील चाचणीचे निकष बदलले; दिवसभरात रुग्णांची संख्या पोहोचली...

दरम्यान, बांदल यांना पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले. त्यानुसार, बांदल हे त्यांच्या एका कार्यकर्त्यासह मागील आठवड्यात पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांची दोन दिवस पोलिसांनी चौकशी केली.

- कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी?

त्याचबरोबर त्यांचा या प्रकरणामध्ये जबाबही घेण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये बांदल यांचा खंडणीच्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे निश्‍चित झाले होते. त्यानंतर शनिवारी खंडणी विरोधी पथकाने बांदल यांना अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Pune police arrested Mangaldas Bandal in ransom case