सिंहगडच्या प्राध्यापकांबाबत अखेर तोडगा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीमधील प्राध्यापकांच्या थकीत पगारावर सोमवारी अखेर तोडगा काढण्यात आला. सोसायटीमार्फत प्राध्यापकांच्या गेल्या 14 महिन्यांपासून थकलेल्या पगाराच्या रकमेचा धनादेश मंगळवारी (ता. 21) दुपारी चार वाजेपर्यंत देण्यात यावा, असे आदेश धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी दिले आहेत. 

पुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीमधील प्राध्यापकांच्या थकीत पगारावर सोमवारी अखेर तोडगा काढण्यात आला. सोसायटीमार्फत प्राध्यापकांच्या गेल्या 14 महिन्यांपासून थकलेल्या पगाराच्या रकमेचा धनादेश मंगळवारी (ता. 21) दुपारी चार वाजेपर्यंत देण्यात यावा, असे आदेश धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी दिले आहेत. 

सिंहगड समन्वय समिती आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने धर्मादाय सह आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले. संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी आणि गैरव्यवहाराची चौकशी करावी, गेल्या अनेक महिन्यांपासून असणारे थकीत पगार मिळावे, प्राध्यापकांवरील बदली आणि बडतर्फची कारवाई रद्द करावी, संप काळातील बेकायदेशीरपणे कापलेले वेतन व भत्ते देण्यात यावे, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनाची दखल घेत सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी सिंहगड एज्युकेशन सोसायटीतील संबंधितांना त्वरित बोलावून घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे संस्थेचे शिष्टमंडळ बैठकीला आले. "प्राध्यापकांच्या थकीत पगाराविषयी संस्थेची काय भूमिका असेल' असे देशमुख यांनी या शिष्टमंडळाला विचारले. त्यावर शिष्टमंडळाने काही वेळ मागितला. त्याप्रमाणे प्राध्यापकांच्या थकीत पगाराच्या रकमेचा धनादेश मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत कार्यालयात आणून देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. संस्थेतील जवळपास 400 प्राध्यापकांचे पगार गेल्या 18 महिन्यांपासून थकले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी संस्थेने चार महिन्यांचा पगार प्राध्यापकांना देऊ केला. आता उर्वरित 14 महिन्यांचा पगारही देण्याचे संस्थेने मान्य केले आहे. 

""सिंहगड एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक नेमणे आणि चौकशी करणे, या मागण्यांबाबत त्वरित निर्णय घेता येणार नाही. मात्र, संस्थेतील जवळपास 400 प्राध्यापकांना बडतर्फ करण्यात आले असून, या प्राध्यापकांना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात येत्या 2 सप्टेंबर स्वतंत्र बैठक बोलाविण्यात आली आहे.'' 
- दिलीप देशमुख, धर्मादाय सहआयुक्त 

""आमच्या हक्काच्या पगाराची मागणी केली म्हणून संस्थेने काढून टाकले. संस्थेत प्राध्यापक असल्याने काही मर्यादा येत होत्या. परंतु, शेवटी 14 महिन्यांच्या थकलेल्या पगारासाठी स्वत:च रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागला.'' 
- अश्‍विन महेंद्रकर, प्राध्यापक

Web Title: Finally resolve the professors of Sinhgad