दूरशिक्षणचा विद्यार्थ्यांवर आर्थिक भार

दूरशिक्षणचा विद्यार्थ्यांवर आर्थिक भार

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दूरशिक्षण पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करताना प्रवेश शुल्कात बहिःस्थच्या शुल्कापेक्षा मोठी वाढ केली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे शुल्क भरण्याबरोबरच संपर्क केंद्रासाठी एक हजार रुपये आणि बाराशे रुपये अभ्यास साहित्यासाठी असे सुमारे पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

विद्यार्थी संघटना आंदोलन करणार
दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या वाढीव शुल्काबद्दल विद्यार्थी संघटनांकडून टीका होत आहे. याबद्दल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषी परदेशी म्हणाले, ‘‘अवाजवी शुल्क निश्‍चित करणे ही विद्यार्थ्यांची पिळवणूक आहे. हे शुल्क तातडीने कमी करावे; तसेच बहिःस्थ पद्धत अचानक न बंद करता विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन पुढील वर्षी बंद करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी देखील शुल्क कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विद्यापीठाने दूरशिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) पद्धत सुरू केल्यानंतर बहिःस्थ अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद केले आहेत. कोणताही अभ्यासक्रम बंद करताना किमान सहा महिने आधी त्याची पूर्वसूचना देणे अपेक्षित असते; परंतु विद्यापीठाने अचानक हा निर्णय घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना याबाबत कल्पना नव्हती. बहिःस्थचे शुल्क सुमारे तीन हजार रुपये ठेवण्यात आले होते. आता त्यात वाढ करून, दूरशिक्षणचे शुल्कही अवाजवी निश्‍चित केल्याने त्याचा भार महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांवर पडणार आहे. 

दूरशिक्षण पद्धतीत संपर्क तास पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे काम करून पदवी वा पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या अटीचा अडसर निर्माण होणार आहे. मुक्त अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, ‘‘बहिःस्थ अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात वाढ केलेली नाही. मात्र, संपर्क केंद्र शुल्क आणि अभ्यासक्रम साहित्याचे शुल्क वाढणार आहे.’’

कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बहिःस्थ अभ्यासक्रमाला प्रवेश हवा असेल, तर तो त्यांना देण्यात येईल. मात्र, कोणत्याही शाखेच्या प्रथम वर्षाचे प्रवेश मात्र दूरशिक्षण अभ्यासक्रमांना देण्यात येतील, असे डॉ. सोनावणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी http://www. unipune. ac.in/ sol या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com