Pune News : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना आता पाचशे रुपये दंड!

इंदौरच्या धर्तीवर पुण्यातही स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडून कडक पावले.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे - तुम्ही रस्त्यावर थुंकताय? रस्त्यावर कचरा टाकताय? तुम्ही असे काही करून शहरात अस्वच्छता निर्माण करत असाल, तर महापालिकेचे पथक तुमच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई करणार आहे. हा दंड आता १८० रुपयांवरून थेट पाचशे रुपये करण्यात आला आहे.

त्यामुळे शहरात अस्वच्छता करण्यापूर्वी तुम्हाला दंड भरण्यासाठी पाचशे रुपये खिशात ठेवावे लागणार आहेत. इंदौरच्या धर्तीवर आता पुण्यातही बेशिस्त नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी दंडात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाला नवीन वाहने ही पुरविण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाकडून जी २० परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली होती. मात्र या तात्पुरत्या कारवाईनंतर पुन्हा एकदा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या इंदौर शहराचा अभ्यास दौरा केला. त्यानंतर इंदौरच्या धर्तीवर पुण्यातही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला सूचना दिल्या होत्या. बेशिस्त नागरिकांवर अधिकाधिक कारवाई व्हावी, यासाठी महापालिकेने नवीन वाहने घेतली असून संबंधित विभागाच्या भरारी पथकाला ही वाहने देण्यात आली आहेत.

शहरात रस्ते, दुभाजक, चौक, पदपथ, बसथांबे, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा खाऊन थुंकणे, कचरा टाकणे व अन्य प्रकारे अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिकांवर आत्तापर्यंत १८० रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यानंतरही बेशिस्त नागरिकांमध्ये सुधारणा होत नसल्याने महापालिका प्रशासनाने या दंडाच्या रकमेमध्ये ३२० रुपयांची वाढ करून पाचशे रुपये इतका दंड आकारण्याचे निश्‍चित केले आहे.

त्यानुसार, आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com