मनसेच्या कसबा उपविभाग अध्यक्षावर गुन्हा; वाचा, काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

स्वारगेट पाणी पुरवठा विभागाच्या आवारात पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होत नाही या कारणावरून संग्राम तळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलन केले. "पाणी द्या, पाणी द्या' अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या होत्या.​

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा विधानसभा उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर (वय 45, रा. खडकमाळ अळी) यांच्यासह चार कार्यकर्त्यांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागात पाण्यासाठी आंदोलन करताना कार्यालयाची तोडफोड, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. हे आंदोलन मंगळवारी (ता. 8) सायंकाळी करण्यात आले होते. याप्रकरणी आतिश जाधव (वय 50, रा. चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

स्वारगेट पाणी पुरवठा विभागाच्या आवारात पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होत नाही या कारणावरून संग्राम तळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलन केले. "पाणी द्या, पाणी द्या' अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या होत्या. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात शिरून स्टाफला पाणी पिण्यासाठी ठेवण्यात आलेला माठ शासकीय वाहनावर फोडण्यात आला. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीत 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एस. लाहोटे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR filed against MNS Kasba subdivision president