आमदार टिळेकरांसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

आमदार टिळेकरांसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

पुणे - इंटरनेटसाठी आवश्‍यक फायबर ऑप्टिकल केबल टाकणाऱ्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकवून त्रास देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार योगेश टिळेकर तसेच त्यांच्या भावासह तिघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे सत्ताधारी भाजपसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन, साथीदार गणेश कामठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. खंडणी मागणे (भारतीय दंड संहिता ३८५ अन्वये), चोरी (३७९), सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तोडफोड करणे (४२७), संगनमत करणे (३४) आदी कलमांचा या गुन्ह्यात समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एरंडवणा येथील ई व्हिजन टेलि इन्फ्रा या कंपनीत शहर दक्षिण विभागाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

संबंधीत कंपनीमार्फत आयटी कंपन्यांना इंटरनेटसाठी आवश्‍यक ऑप्टिकल केबल जोडून देण्याचे काम केले जाते. ७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीमध्ये संबंधीत कंपनीकडून कात्रज - कोंढवा रस्ता परिसरात केबल टाकण्याचे काम सुरू होते. आमदार टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर व साथीदार गणेश कामठे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावित काम थांबविले. फिर्यादींशी संपर्क साधून आपल्या मतदारसंघात काम सुरू ठेवण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी ७ सप्टेंबरला मागितली. त्यानंतर फिर्यादी यांनी पुराव्यासह कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याची पडताळणी होऊन गुन्हा दाखल झाला आहे. 

माझ्याविरुद्ध राजकीय षड्‌यंत्र - टिळेकर 
याबाबत योगेश टिळेकर म्हणाले, ‘‘आगामी निवडणुका लक्षात घेता गेल्या चार- पाच महिन्यांपासून माझ्याविरुद्ध राजकीय षड्‌यंत्र सुरू आहे. माझे २२ वर्षांचे राजकीय जीवन उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न काही घटक हेतूतः करीत आहेत. कोंढवा पोलिसांनीही पडताळणी न करता हा गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणच खोटे आहे. एका कार्यकर्त्याला मदत करा, असे म्हटले होते. परंतु, एक रुपयांचीही खंडणी मागितली नव्हती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी पत्र देणार आहे. त्यात हेतूतः मला त्रास देणारे घटक, माझ्याविरुद्ध सुरू असलेला राजकीय कट, त्यातील काही व्यक्ती यांची माहिती त्यांना देणार आहे. मी केलेली विकासकामे बघवत नसलेल्या लोकांनी माझ्याविरुद्ध कट रचला आहे.’’

विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव
टिळेकर हे आमदार असल्याने त्यांना अटक करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्‍यक असते. त्यादृष्टीने कोंढवा पोलिसांनी याबाबतचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

आमदार योगेश टिळेकर यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार आली होती. चौकशी केल्यानंतर पैसे मागणे, कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
 -शिवाजी बोडखे, सहपोलिस आयुक्‍त.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com