पुणे : लाचप्रकरणी पीएसआय, पोलिस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- 20 हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

पुणे : आरोपीला जामीन करण्यास मदत करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या कोंढवा पोलिस ठाण्याचा पोलिस उपनिरीक्षक, पोलिस शिपायासह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रविवारी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यापैकी एका व्यक्तीस अटक करण्यात आली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पोलिस उपनिरीक्षक भीमराव भिकाजी मांजरे (वय 32), पोलिस शिपाई गोपाळ हरी दाभाडे (वय 25) लाच स्विकारणारी व्यक्‍ती राजू उस्मान आत्तार (वय 48, रा. कोंढवा) या "एसीबी'ने गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या नातेवाईकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना अटक केली होती. तक्रारदाराच्या अटक केलेल्या नातेवाईकाचा जामीन करण्यास मदत करण्यासाठी मांजरे याने एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती त्यांच्यामध्ये वीस हजार रुपये देण्याची निश्‍चित झाले.

दरम्यान, तक्रारदार यांनी याप्रकरणी "एसीबी'कडे तक्रार केली. त्याची पडताळणी झाल्यानंतर रविवारी कोंढवा पोलिस ठाण्यात सापळा रचण्यात आला. त्यावेळी मांजरे याच्यामार्फत पोलिस शिपाई दाभाडे याने लाच स्विकारण्यास मदत केली. खासगी व्यक्ती राजु आत्तार याने तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच स्विकारली.

या घटनेनंतर मांजरे व दाभाडे हे दोघांनी तेथून पलायन केले. तर आत्तार यास अटक केली. तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण, संजय पाटील, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR registered against PSI and Police Constable in Bribe