पुण्यात आगीत 75 झोपड्या खाक; जीवितहानी टळली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

पुणे : मार्केट यार्डजवळील आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. काही वेळांतच आगीने रौद्ररूप धारण केले; त्यातच सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग आणखीन भडकली. त्यामध्ये 75 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून एका तासात ही आग आटोक्‍यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

पुणे : मार्केट यार्डजवळील आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. काही वेळांतच आगीने रौद्ररूप धारण केले; त्यातच सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग आणखीन भडकली. त्यामध्ये 75 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून एका तासात ही आग आटोक्‍यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

अग्निशामक दलास या आगीबाबत सकाळी 10.26 वाजता माहिती मिळाली. त्यानंतर स्टेशन ऑफिसर प्रकाश गोरे व चालक राजू शेलार हे एक गाडी घेऊन घटनास्थळाकडे निघाले. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोचल्यानंतर आगीचे लोट दिसल्याने गोरे यांनी आणखी दोन अग्निशामक दलाच्या गाड्या मागविल्या. जागेची अडचण व अरुंद रस्त्यांमुळे आग अटोक्‍यात आणण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तत्काळ तीन जेसीबी मागवून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न झाला. तत्पूर्वी झोपड्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यांमधून चहूबाजूंनी आग नियंत्रणास आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी सत्तरहून अधिक जवान प्रयत्न करीत होते. धूर व आगीच्या ज्वाळांमुळे अग्निशामक दलाचे जवान रौफ शेख यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. 

दरम्यान, झोपड्यांमध्ये असलेल्या सात ते आठ सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. जीवितहानी टाळण्यासाठी 15 अग्निशामक बंब, 13 पाण्याचे टॅंकर व दोन रुग्णवाहिका घटनास्थळी मागविण्यात आल्या. दुसरीकडे जवानांनी नजीकच्या इमारती व पक्‍क्‍या घरांवर जाऊन आगीच्या ठिकाणी चहूबाजूंनी पाण्याचा जोरदार मारा केला. 11.41 मिनिटांनी आग आटोक्‍यात आली. त्यानंतर 12 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास अग्निशामक दलास यश आले. त्यानंतर नागरिकांनी घराकडे धाव घेऊन मौल्यवान वस्तू, पैसे, भांडी शोधण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे लग्नाचा कार्यक्रम असलेल्या घरातील दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर, उर्वरित ठिकाणी संसारोपयोगी साहित्य, मौल्यवान वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. 

अग्निशामक कर्मचाऱ्यांना मारहाण 
अग्निशामक दलाचे प्रकाश गोरे व राजू शेलार या कर्मचाऱ्यांना आगीच्या ठिकाणी एकच गाडी आणल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. मात्र, त्यानंतरही त्यांनी आग अटोक्‍यात आणण्याचे काम केले.

दरम्यान, आगीची घटना कळताच अग्निशामक विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, विभागीय अधिकारी सुनील गिलबिले, रमेश गांगड यांच्यासह अन्य केंद्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Fire at Ambedkarnagar near Market Yard in Pune