शहरातील आठशे गल्ल्या अरुंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

‘देवदूत’ची खरेदी
शहरातील, निगडी, भोसरी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, आकुर्डी, काळेवाडी, थेरगाव आणि विशेषतः गावठाण भागात अशा प्रकारे गल्लीबोळ आहेत. अशीच समस्या झोपडपट्टी परिसरात जाणवते. बंब तेथे जाऊ शकत नसल्याने अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी देवदूत नावाचे वाहन खरेदी केले आहे. मात्र, त्यात पाण्याची क्षमता जादा नसल्याने त्यावरही मर्यादा येतात.

पिंपरी - आगीच्या घटनांमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. यामुळे अग्निशमन दल कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोचण्याचा प्रयत्न करते. शहरातील जवळपास आठशे गल्ल्यांमध्ये अग्निशमन दलाच्या बंबास जाण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे त्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्‍न आहे. ती करताना पार्किंगसाठी जागा ठेवली जात नाही. त्यामुळे रहिवासी रस्त्यावर आपल्या घरासमोर वाहने पार्क करतात. जेमतेम एखादे छोटे चारचाकी वाहन गल्लीतून जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक असते. अनेकदा रुग्णवाहिकेलाही जागा मिळत नाही. त्यामुळे रुग्णवाहिका मुख्य रस्त्यावर थांबून रुग्णास स्ट्रेचरवरून आणावे लागते.

एलपीजी गॅस हा हवेपेक्षा दीडपट जड असल्याने त्याची गळती झाल्यास जमिनीलगत राहतो. त्यास खालील भागातून जाण्यासाठी जागा मिळाली, तरच तो बाहेर जातो. 

त्याचा आगीशी संपर्क आल्यास त्याची विध्वंस क्षमता अडीचशेपटीने वाढते आणि स्फोट होतो. अशावेळी आगीच्या ठिकाणी पोचण्यासाठी बंबास जागाच नसते. दिवसा गल्लीबोळातील वाहने कामासाठी घेऊन जातात. मात्र, रात्री ती गल्लीत पार्क केली जातात. अशावेळी घटनास्थळी पोचण्यास अग्निशमन दलास तारेवरची कसरत करावी लागते.

एखाद्या ठिकाणी लागलेली आग उग्र स्वरूप धारण करण्यासाठी ३० सेकंद पुरेसे असतात. महामार्गावरही गतिरोधक असल्याने अग्निशमन बंबावर मर्यादा येतात. त्यामुळे नागरिकांनी किमान स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाच्या बंबासाठी जागा सोडावी.
- ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Brigade City Narrow Alley