esakal | पुतळे आणि मुर्त्या आगीत भस्मसात; उद्घाटनापूर्वीच पु्ण्यातील कलाकाराच्या स्वप्नांची राखरांगोळी

बोलून बातमी शोधा

fire pune

उद्घाटनापूर्वीच मोठ्या उत्साहाने उभ्या केलेल्या स्टुडीओला आग लागल्याची घटना पुण्यात घडली आहे.

पुतळे आणि मुर्त्या आगीत भस्मसात; उद्घाटनापूर्वीच पु्ण्यातील कलाकाराच्या स्वप्नांची राखरांगोळी
sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे): 'स्टुडीओला आग लागली आहे, तुम्ही लवकर या. फोनवरील शब्द ऐकून काळजात धडकी भरली.' उद्घाटनापूर्वीच मोठ्या उत्साहाने उभ्या केलेल्या स्टुडीओला आग लागल्याची घटना पुणे-पानशेत रस्त्याला लागून गोऱ्हे खुर्द येथे घडली आहे. याबाबतचा प्रसंग सांगताना मुर्तीकार विनोद येलारपूरकर यांना अश्रू अनावर झाले. मुंबई येथील जे.जे. आर्ट कॉलेजमधून कलेचे शिक्षण घेतलेले विनोद येलारपूरकर आणि त्यांचे बंधू विशाल येलारपूरकर हे गेल्या पस्तीस वर्षांपासून वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे, देवीदेवतांच्या मुर्त्या, ऐतिहासिक देखावे तयार करून त्यावर आपला उदरनिर्वाह चालवतात. अगोदर पुण्यातील भाड्याच्या जागेत व्यवसाय चालवणाऱ्या येलारपूरकर बंधूंनी काही महिन्यांपूर्वीच पुणे-पानशेत रस्त्याला लागून गोऱ्हे खुर्द (ता.हवेली) येथे स्वत:ची जागा खरेदी केली व त्यावर स्टुडिओ उभा केला होता. मात्र, आता हा स्टुडीओ उद्घटनाच्या आधीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. 

हेही वाचा - पानशेतजवळ खडकवासला धरणात कोसळली कार; 3 जणांचा मृत्यू, 1 बेपत्ता

याबाबत बोलताना येलारपूरकर बंधूंनी म्हटलं की, सकाळी अकरा वाजताच्या सुमारास स्टुडीओच्या शेजारी काही अंतरावर राहणाऱ्यांचा फोन आला. थरथरणाऱ्या हातांनी फोन खिशात ठेवला आणि दोघा भावांनी हिंगणे खुर्द येथून निघून अर्ध्या तासाच्या आत सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोऱ्हे खुर्द येथील आमचा स्टुडिओ गाठला. समोरचे दृश्य पाहून अंगातील राहीलेली शक्तीही निघून गेली. आगीच्या ज्वाला आणि धुराने अक्षरशः आसमंत गाठला होता. काय करावे ते सुचेना. अग्निशमन दलाला फोन केला. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली परंतु तोपर्यंत जीव ओतून तयार केलेले छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे पुतळे, देवी-देवतांच्या मुर्त्या यांची राख झाली होती. आग एवढी भयानक होती की दोन मजल्यांच्या स्टुडीओचे लोखंडी खांब वितळून आख्खा स्टुडिओ जमिनदोस्त झाला आहे. मोठ्या कष्टाने मी हे स्वप्न रंगवले होते. आयुष्यभराची कमाई त्यासाठी लावली होती. सगळं काम पूर्ण झालं होतं. पुढच्या दहा-पंधरा दिवसांमध्ये उद्घाटन करायचं होतं असं सांगताना शेवटी मुर्तीकार विनोद येलारपूरकर यांना अश्रु अनावर झाले.

हेही वाचा - पुण्यात हॉटेल, थिएटरसह पीएमपी 7 दिवस बंद; संचारबंदीच्या वेळेत वाढ

दि.1 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आजुबाजुच्या परिसरातील जंगलाला लागलेली आग स्टुडीओपर्यंत पोहोचली आणि येलारपुरकर यांनी मोठ्या कष्टाने जीव ओतून तयार केलेले शिवराज्याभिषेक सोहळा समुह शिल्प, कोल्हापूरच्या महालक्ष्मीची अकरा फुटी मूर्ती, हत्ती, साचे, फायबरचा कच्चा माल असे सर्वकाही जळून खाक झाले आहे. यात सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उद्घाटनापूर्वीच अशी दुर्घटना घडल्याने येलारपूरकर बंधूंना मोठा मानसिक धक्का बसला आहे.आमच्या तयार केलेल्या मुर्त्या, पुतळे जळाले असले तरी आमची कला जिवंत आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी साथ दिल्यास आम्ही पुन्हा नव्याने उभारी घेऊ, अशी आशा व अपेक्षा विनोद येलारपूरकर यांनी व्यक्त केली आहे.