खडकवासला परिसरातील शेकडो हेक्टर वनसंपदेची राखरांगोळी

खडकवासला, नांदोशी, सणसनगर या भागातील जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत असून यामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदेची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे.
Khadakwasala Fire
Khadakwasala FireSakal
Summary

खडकवासला, नांदोशी, सणसनगर या भागातील जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत असून यामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदेची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे.

किरकटवाडी - मागील दोन ते तीन दिवसांपासून खडकवासला, (Khadakwasala) नांदोशी, सणसनगर या भागातील जंगलांना (Forest) मोठ्या प्रमाणात आग (Fire) लागण्याच्या घटना घडत असून यामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदेची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वनविभागाने आगीला प्रतिबंध घालण्यासाठी टाकलेल्या जाळरेषा (फायर लाईन) अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. वनविभागातील अधिकारी व कर्मचारी या आगीचे खापर नागरीकांच्या डोक्यावर फोडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

खडकवासला,नांदोशी, सणसनगर व आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सरकारी व खाजगी वनजमीन आहे. हरिण, चितळ, ससा, बिबट, वानर या प्राण्यांसह मोर व इतर प्राणी-पक्षांचा अधिवास या जंगलात आढळतो. साग, बांबू, ‌खैर, बाभुळ, कडुनिंब, चंदन अशी झाडे, औषधी वनस्पती, वेली अशा समृद्ध वनसंपदेने नटलेला हा परिसर आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात या जंगलांना आग लागून ही वनसंपत्ती नष्ट होते. वन विभागाकडून दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी आगीला प्रतिबंध करण्यासाठी जाळरेषा टाकण्याचे काम हाती घेतले जाते मात्र त्याचा फायदा अद्याप कधी झालेला दिसला नाही.

उंचसखल भूभाग व वाळलेल्या फांद्या, पालापाचोळा,गवत यांमुळे एकदा आग लागल्यानंतर विझवणे तर दूर जवळ जाणे सुद्धा शक्य होत नाही. परिणामी वन व प्राणी संपत्तीची अतोनात हानी होते. याबाबत वनविभागाने जबाबदारी न ढकलता अशा आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. उपयुक्त ठरतील अशा जाळरेषा टाकणे, गस्तीसाठी पथके तैनात करणे, आग विझविण्यासाठी प्राथमिक साधनसामग्री तयार ठेवणे, नागरिकांना मार्गदर्शन करुन सहकार्य मिळवणे अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे.

"दोन दिवसांपासून जंगल जळत आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी फिरकले नाहीत. अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर नागरिकच जंगलाला आग लावतात अशी उत्तरे दिली जातात. असे असेल तर वनविभाग अशा अपप्रवृत्तीच्या नागरिकांवर कारवाई का करत नाही? या वनव्यांमुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होते."

- विजय मते, नागरिक, खडकवासला.

"उंचसखल भूभाग असल्याने जाळरेषा टाकताना अडचणी येतात. वन विभागाकडून वनवे रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. खडकवासला येथील डोंगराला लागलेली आग विझविण्यासाठी स्थानिक वन विभागातील अधिकारी, कर्मचारी व वनमजूर यांना पाठविण्यात आले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वन परिक्षेत्र अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com