झालंय सगळं उध्वस्त.. पण पुन्हा उभं करू आपण..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

लक्ष्मी गाढे बुधवारी नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. त्या राहत असलेल्या पाटील इस्टेटमधील झोपडपट्टीला आग लागल्याची बातमी समजली आणि त्या तातडीनं घरी निघाल्या. घरी पोचल्यावर त्यांना स्वत:चा संसार डोळ्यांदेखत आगीत खाक होताना पाहावा लागला. फक्त त्यांचाच नव्हे.. वस्तीतल्या सगळ्यांचाच संसार आगीनं गिळून टाकला होता. 

पुणे : लक्ष्मी गाढे बुधवारी नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. त्या राहत असलेल्या पाटील इस्टेटमधील झोपडपट्टीला आग लागल्याची बातमी समजली आणि त्या तातडीनं घरी निघाल्या. घरी पोचल्यावर त्यांना स्वत:चा संसार डोळ्यांदेखत आगीत खाक होताना पाहावा लागला. फक्त त्यांचाच नव्हे.. वस्तीतल्या सगळ्यांचाच संसार आगीनं गिळून टाकला होता. 

पसरत चाललेली आग.. त्यातच घरातील इतर ज्वालाग्रही वस्तूंची आणि सिलिंडरचीही भर पडत होती. अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या होत्या आणि ते कर्मचारीही प्राणपणानं ताकद लावून ही आग शमविण्याचा प्रयत्न करत होते. एव्हाना बघ्यांची गर्दीही वाढली होती. लक्ष्मीबाईंसह ज्यांचे संसार त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते, ते फक्त सुन्न होऊन पाहत होत्या. अग्निशमन दलाच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. तोपर्यंत त्या वस्तीतील सर्व कुटुंबं उघड्यावर आली होती. 

सगळ्यांनीच आपापाल्या उध्वस्त झालेल्या घराकडे धाव घेतली. प्रेमानं, हौसेनं घेतलेल्या वस्तू जळून खाक झाल्याचे पाहताना प्रत्येकजण रडत होता. काही वेळापूर्वीच या अग्नितांडवामुळे सुन्न झालेल्या लक्ष्मीबाई आता मात्र धीरानं उभ्या राहिल्या. 'आपली घरं गेली; पण जीव तर शाबूत आहे ना.. मग पुन्हा उभं करू आपण हे सगळं.. अंगात जीव आहे.. हे सगळं पुन्हा मिळवायला वेळ लागणार नाही..!' असं सांगत त्या प्रत्येकाला धीर देत होत्या. त्या आगीत खुद्द लक्ष्मीबाईंचंही घर जळून खाक झालं आहे.. पण इतरांना धीर देताना त्यांनी स्वत:च्या घराकडे पाहिलंही नाही.. 'सगळं पुन्हा उभं करू' हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.. आणि हाच विश्वास त्या इतरांनाही देऊ पाहत वस्तीत फिरत होत्या.

Web Title: A Fire In The Patil Estate Slum area

टॅग्स