शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

पुणे - ग्रामपंचायत निवडणुकीतील भांडणाच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तीन दिवसांपूर्वी हडपसर येथे गोळ्या झाडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मांजरीच्या सरपंच, सदस्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. तर सोमवारी सायंकाळी एका वकिलावर संगमवाडी येथे अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला. एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात दोन गोळीबाराच्या घटना सोमवारी घडल्या.

विशाल शिवाजी ढोरे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ढोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद कोद्रे (वय ४५) शिवराज घुले (वय ४५, दोघेही रा. मांजरी बुद्रुक), संतोष भंडारी (वय ३२), दीपक भंडलकर (वय २६, रा. शेवाळवाडी) यांच्यासह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढोरे हे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष आहेत. ढोरे हे त्यांचे मित्र शरद देवकाते यांच्याशी १९ ऑक्‍टोबरला सायंकाळी सात वाजता सोलापूर महामार्गालगत असलेल्या मांजरी स्टड फार्मजवळ बोलत थांबले होते. त्या वेळी कोद्रे, घुले यांनी ग्रामपंचायत निवडणुकी वेळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कोद्रे, घुले, भंडारी, भंडलकर व त्यांच्या साथीदारामार्फत जिवे मारण्याच्या उद्देशाने ढोरे यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, या घटनेबाबत गुन्हा हडपसर पोलिसांकडे दाखल झाला. गोळीबाराच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार घुले हे मांजरीचे सरपंच असून कोद्रे हे सदस्य आहेत.

वकिलावर गोळीबार
दरम्यान, सोमवारी रात्री साडेआठ वाजता कारमधून जात असलेल्या ॲड. देवानंद ढेकणे (रा. येरवडा) यांच्यावर संगमवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी पिस्तुलातून गोळीबार केला. यात ढोकणे यांच्या डोक्‍याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. ॲड. ढेकणे यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर तेथून पसार झाले. ॲड. ढेकणे यांच्यावरील हल्ल्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दरम्यान, ढेकणे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com