सोमेश्वर कारखाना : एकरकमी एफआरपीनुसार प्रतिटन २८०८ रूपये पहिली उचल

संतोष शेंडकर
Thursday, 3 December 2020

साखरबाजार अडचणीत असल्याने एफआरपी एकरकमी मिळणार की तुकडे होणार? या प्रश्नाचे शेतकऱ्यांच्या उत्तर सोमेश्वर कारखान्याने दिले आहे. एकरकमी एफआरपीनुसार प्रतिटन २८०८ रूपये इतकी पहिली उचल देण्याचा निर्णय आज सोमेश्वरच्या संचालक मंडळाने घेतला आहे.

सोमेश्वरनगर : साखरबाजार अडचणीत असल्याने एफआरपी एकरकमी मिळणार की तुकडे होणार? या प्रश्नाचे शेतकऱ्यांच्या उत्तर सोमेश्वर कारखान्याने दिले आहे. एकरकमी एफआरपीनुसार प्रतिटन २८०८ रूपये इतकी पहिली उचल देण्याचा निर्णय आज सोमेश्वरच्या संचालक मंडळाने घेतला आहे. ही एफआरपी जिल्ह्यात सर्वाधिक तर आहेच पण पहिल्या उचलीची कोंडी फोडण्याचे कामही सोमेश्वरने केले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

चालू हंगाम सुरू झाल्यापासून अतिरीक्त साखर, अतिरीक्त उसाचे संकट घोंगावते आहे. अशात साखरेला उठावही नाही आणि त्यामुळे बँकांनी साखरेच्या पोत्यावर उचल देताना हात काहीसा आखडता घेतला आहे. यामुळे एफआरपी एकरकमी मिळणार की तुकड्या तुकड्यात याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली होती.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

सांगली, कोल्हापूरच्या काही आर्थिक सक्षम कारखान्यांनी एकरकमी एफआऱपी जाहिर केल्या मात्र, पुणे जिल्ह्यात एफआरपीची कोंडी कोण फोडणार याची उत्सुकता होती. चौदा दिवसात एफआरपी मिळणे क्रमप्राप्त असताना महिना उलटून गेल्यावरही कारखाने मौनात होते. मात्र ही कोंडी सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने आज फोडली. आज एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर संचालक मंडळाने मोहोर उमटवली. १० डिसेंबरपर्यंत पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी दिली. 

'सकाळ'शी बोलताना जगताप म्हणाले, लॉकडाऊन पडल्यापासून शेतमालाला भाव नाहीत. त्यात अतिवृष्टी आणि आता लहरी हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला उसाशिवाय पर्याय नाही हे ओळखून संचालक मंडळाने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्षेत्रात नव्या ऊस लागवडींची बांधणी चालू आहे शिवाय शाळाही सुरू होत आहेत. तसेच सोसायट्यांचीही बाकी आहे. या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी आधार ठरणार आहे. मात्र, ही रक्कम देताना नक्कीच कसरत होणार आहे. इथेनॉल, वीजविक्री यासह पैशांची थोडी जुळवाजुळव करून कसरत यशस्वी करू.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साखरनिर्यात आवश्यक-देशात साखरसाठा प्रचंड वाढत चालला असल्याने साखरेचे भाव ३१०० रूपये प्रतिक्विंटलवर ठप्प झाले आहेत. यासाठी केंद्रसरकारने साखरेची प्रोत्साहन अनुदानासह निर्यातीची योजना या वर्षातही सुरू करावी. तसेच साखरेच्या किमान वैधानिक दरात वाढ करण्याचा प्रलंबित ठेवलेला विषयही मार्गी लावावा. साखरेला ३४०० ते ३५०० रूपये दर करणे आवश्यक आहे. असे झाल्यास कारखाने शॉर्ट मार्जीनमध्ये न येता दर देऊ शकतील, असे मत पुरूषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First lift of Rs 2,808 per tonne as per frp says someshwar administration