Eye Cancer Patient : पुण्यात पहिला डोळ्याच्या दुर्मीळ कर्करोगाचा रुग्ण First rare eye cancer patient in Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eye Cancer

Eye Cancer Patient : पुण्यात पहिला डोळ्याच्या दुर्मीळ कर्करोगाचा रुग्ण

पुणे - वयाची ६५ वर्षे ओलांडलेल्या गृहस्थांची दृष्टी अचानक अंधूक झाली. समोरच्या सगळ्याच वस्तू अस्पष्ट झाल्या. वयोमानानुसार मोतीबिंदू झाला असेल, या धारणेने त्यांनी नेत्ररुग्णालयाच्या पायऱ्या चढल्या. पण, त्यांना डोळ्यांचा दुर्मीळ कर्करोग झाल्याचे निदान झाले.

‘कोरॉइडल मेलेनोमा’ हा प्रौढांमध्ये दिसणारा डोळ्यांचा दुर्मीळ कर्करोग आहे. त्याचे निदान या ६५ वर्षीय रुग्णामध्ये झाले होते. सुमारे दहा लाख लोकसंख्येमध्ये या कर्करोगाचे पाच रुग्ण आढळतात, इतका हा दुर्मीळ कर्करोग आहे. याचे निदान डोळ्यात झाल्याने त्यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली, त्या वेळी तो इतर अवयवांमध्येही पसरल्याचे समोर आले.

असे झाले निदान...

अंधूक दिसत असल्याने डोळ्यांची प्रथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर डोळ्यांची सोनोग्राफी झाली. त्यातून पडद्याच्या खाली गाठ असल्याचे स्पष्ट झाले. त्याच सोनोग्राफीतून ही गाठ ‘मेलेनोमा’ची असल्याचे निश्चित निदान झाले. त्यानंतर इतर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यातून कर्करोग शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरल्याचे समजले, अशी माहिती राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थाचे (एनआयओ) संचालक आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी दिली.

डोळ्यांच्या कर्करोगाचे प्रकार

डोळ्यांचा कर्करोग हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये आढळतो. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाला वैद्यकीय परिभाषेत रेटिनोप्लास्टी म्हणतात, तर प्रौढांमध्ये कोरॉइडल मेलेनोमा या प्रकारचा कर्करोग आढळतो. लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या पडद्याचा कर्करोग होतो, तर मोठ्या माणसांमध्ये डोळ्याला रक्तपुरवठा करणाऱ्या भागामध्ये कर्करोगाच्या गाठी आढळतात.

प्रसार कसा होतो?

डोळ्याला रक्तपुरवठा करणाऱ्या भागात असंख्य सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे असते. तेथे कर्करोगाची वाढ झाल्याने रक्तवाहिन्यांमधून हा कर्करोग शरीराच्या इतर अवयवांमध्ये पोचतो. विशेषतः यकृतामध्ये तो पोचल्यानंतर तेथून त्याची वाढ झपाट्याने होऊ लागते.

लक्षणे न दाखवणारा आजार

कोरॉइडल मेलेमोना या डोळ्याच्या कर्करोगामध्ये रुग्णाला आजाराची कोणतीच ठळक लक्षणे सुरवातीला दिसत नाहीत. त्यामुळे डोळ्याला रक्तपुरवठा करणाऱ्या भागात कर्करोग वाढतो. त्याची पूर्ण वाढल्यानंतर रुग्णाची दृष्टी अंधूक होते. तेव्हा रुग्ण डोळ्याची तक्रार घेऊन येतो. त्यामुळे हा लक्षणे न दाखवणारा आजार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपचाराला मर्यादा

डोळ्यातील कर्करोगाचा प्रसार शरीराच्या इतर अवयवांमध्ये झालेला असतो. त्यामुळे त्याच्या उपचारांना मर्यादा पडतात. त्यातच रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असल्यास उपचारातील गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो.

कशामुळे होतो?

कोणत्याही कर्करोगामागे धूम्रपान हे प्रमुख कारण असते, तसेच यामागेही आहे.

याकडे लक्ष द्या

- घरात यापूर्वी डोळ्याच्या कर्करोगाची घटना असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींना काळजी घ्या

- डोळ्याची दृष्टी कमी होत जाणे

- डोळा सतत लालसर राहणे

- सातत्याने डोळ्यात वेदना होणे

डोळ्याला रक्तपुरवठा करणाऱ्या भागाचा कोरॉइडल मेलेनोमा हा प्रौढांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. भारतात हा दुर्मीळ कर्करोग असला तरीही पाश्चात्त्य देशांमधील श्वेतवर्णीय नागरिकांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. या कर्करोगाचे लवकर निदान आणि उपचारासाठी तेथे स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. आपल्याकडे या कर्करोगाबाबत जागृतीची गरज आता निर्माण झाली आहे.

- डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, एनआयओ

टॅग्स :CancerpunePatientEye