देहूत माशांचे भवितव्य धोक्‍यातच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत येथे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ३१ जुलैपर्यंत कार्यान्वित होणार नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी देहू ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेले आश्‍वासन पूर्ण होणार नाही, असे चित्र आहे. देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे दूषित पाण्यामुळे मृत झाले होते.

देहू - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत येथे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ३१ जुलैपर्यंत कार्यान्वित होणार नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी देहू ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेले आश्‍वासन पूर्ण होणार नाही, असे चित्र आहे. देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे दूषित पाण्यामुळे मृत झाले होते.

आषाढी वारीपूर्वी देहूतील इंद्रायणी नदीतील हजारो मासे दूषित पाण्याने मृत झाले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने देहू ग्रामपंचायत प्रशासनाला नोटीस बजावून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मैला शुद्धीकरण प्रकल्प येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे आश्‍वासन जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायत प्रशासनाने प्रदूषण मंडळाला दिले होते. मात्र, अद्याप या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेला वीजपुरवठा मिळाला नसल्याने हा प्रकल्प ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे.

याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने म्हणाले, ‘‘वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठा मिळणे बाकी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तो लवकरच मिळेल. या योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. सोमवारी (ता. २२) याबाबत जिल्हा नियोजन बैठकीत चर्चा झालेली आहे. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले आहे. इकडे तिकडे चार-पाच दिवस होऊ शकतात. शक्‍यतो
येत्या १० ऑगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल.

देहूचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर म्हणाले, ‘‘पंधरा ऑगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, असे प्राधिकरणाने कळविले आहे. तसेच, ३१ जुलैपर्यंत इंद्रायणी नदीत जाणाऱ्या दूषित पाण्याची वाहिनी योजनेला जोडण्याचे काम पूर्ण होईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish Future Dangerous in Dehu