पदपथांवर मासळी बाजार तेजीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पिंपरी - पादचाऱ्यांसाठी महापालिकेकडून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले जातात. मात्र, शहरातील हेच पदपथ व्यावसायिकांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहेत. महापालिकेकडून या अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ होत असल्याने पिंपरीतील एच. ए. कॉर्नरला मासळी बाजाराचे स्वरूप आले आहे. 

पिंपरी - पादचाऱ्यांसाठी महापालिकेकडून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले जातात. मात्र, शहरातील हेच पदपथ व्यावसायिकांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहेत. महापालिकेकडून या अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ होत असल्याने पिंपरीतील एच. ए. कॉर्नरला मासळी बाजाराचे स्वरूप आले आहे. 

नवीन पदपथ तयार करणे व जुन्यांची दुरुस्ती करण्यावर दरवर्षी पालिका करोडो रुपये खर्च करते; परंतु 70 टक्के पदपथांचा वापर अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना करता येत नाही. नेहरूनगर, पिंपरी - एच. कॉर्नर, मोरवाडी - म्हाडा कॉलनीसमोर, काळेवाडी, निगडी चौक, आकुर्डी खंडोबा माळ आणि आकुर्डी गावठाण अशा परिसरातील मुख्य चौकांतील पदपथांवर फेरीवाल्यांबरोबरच मासे विक्रेत्यांनी मोठे अतिक्रमण केले आहे, त्यामुळे सायंकाळी येथून चालणे अवघड होते. त्याचबरोबर दुर्गंधीसह नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

एच.ए. कॉर्नरवर मासे विक्रेत्यांचा ताबा 
पिंपरी - नेहरूनगरमार्गे एच. ए. कॉर्नरवरील पदपथांवर सुमारे 6-7 मासे विक्रेत्यांनी अनेक वर्षांपासून बस्तान मांडले आहे. हे मासे विक्रेते सायंकाळी साडेपाचनंतर टेम्पो- टॅक्‍सीने येतात. रस्त्यावरच डांबराला घासून सुरीला धार लावतात आणि त्याच सुरीने मासे कापतात. मासे स्वच्छ केल्यानंतर घाण रस्त्यावरच फेकतात. मासे धुतलेले पाणीदेखील रस्त्यावरच फेकतात. यामुळे दुर्गंधी पसरते. पादचाऱ्यांना अक्षरशः नाकाला रुमाल बांधून जावे लागते. 

मोरवाडी कापसे उद्यानासमोर अतिक्रमण 
मोरवाडी- म्हाडा कॉलनी मार्गावरील नारायणराव कापसे उद्यानासमोर दररोज सायंकाळी अनधिकृतपणे मासे व्यावसायिक दुकाने थाटत आहेत. मासे खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. सायंकाळी मासळी बाजार पूर्णपणे सुरू असतो. या अतिक्रमणांवर महापालिकेचे अधिकारी कठोरपणे कारवाई करत नाहीत. 

आकुर्डी गावठाण आणि खंडोबामाळ चौकातदेखील मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. काळेवाडी- पाचपीर या चौकात मासे विक्रेत्यांनी पूर्ण पदपथ ताब्यात घेतलेला दिसून येतो. सायंकाळी या रस्त्यावर मच्छीबाजाराच भरलेला असतो. 

अधिकृत मार्केट कुठे आहे? 
शहरामध्ये नागरिकांसाठी अधिकृत मार्केट व फेरीवाला झोनच नाहीत. मासळी विक्रेत्यांना जागा नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर बसूनच ते व्यवसाय करतात. यामुळे पालिकेने मार्केटच्या भूखंडावरील अतिक्रमण हटवावे व फेरीवाला धोरण मंजूर करण्याची मागणी होत आहे. 

प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यास अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्या- त्या प्रभागातील अधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे. नेहरूनगर चौकामधील मासळी व्यावसायिकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
- अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी, महापालिका

Web Title: Fish market on footpath