माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील पाच जणांवर दोषारोपपत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

गणपती अद्याप फरार
गणपती हा सीपीआय (माओवादी) या संघटनेचा सचिव असून तो फरार आहे, तर इतर ४ आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. गेल्या महिन्यात आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना संरक्षण दिले. सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार या खटल्याचा तपास करीत आहेत. 

पुणे - माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील ५ आरोपींच्या विरोधात गुरुवारी १ हजार ८३७ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी कवी वरावरा राव आणि ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी सीपीआय (माओवादी) संघटनेतील भूमिगत सदस्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलावर विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.  

अटक करण्यात आलेले आरोपी सुधा भारद्वाज, वरावरा राव, अरुण फरेरा, व्हर्णन गोन्साल्विस यांच्यासह फरार आरोपी गणपती यांच्या विरोधात विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर करण्यात आले. देशाचे स्थैर्य धोक्‍यात आणण्याच्या दृष्टीने व सामाजिक स्वास्थ्य बिघडवून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे निर्णय सीपीआयच्या ईस्टर्न रिजनल ब्यूरोच्या बैठकीत झाले होते, असे रोना विल्सन आणि ॲड. गडलिंग यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डेटामधून उघड झाले आहे. देशविरोधी  कारवाया करण्यासाठी लागणारी शस्त्रे व दारूगोळा खरेदी करण्यासाठी मदत करणारा बसंता हा नेपाळमधील माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता आहे. तो राव यांच्या संपर्कात होता. खटल्यातील आरोपी हे सीपीआयचा महासचिव मुपल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती ऊर्फ जी. एस. ऊर्फ कॉ. जी. याच्या संपर्कात राहून संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत; तर राव हे सीपीआयसाठी निधी उभारणे, तो पुरविणे व त्याचे वितरण करण्याचे काम करीत आहे, असे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. 

या प्रकरणात दाखल झालेले हे दुसरे दोषारोपपत्र आहे. यापूर्वी सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, ॲड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम. ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपर्ण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा १० जणांविरोधात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी ५ हजार १६० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

‘बेकायदा कृत्य प्रतिबंधक’नुसार खटला 
आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक अधिनियमानुसार खटला चालविण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. प्रस्तावामध्ये वरावरा राव यांच्यासह २३ जणांवर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला आहे. त्याप्रमाणेच माओवादी आयएपीएल, एजीएमसी, कबीर कला मंच, पीपीएससी अशा फ्रंट ऑर्गनायझेशन्सच्या मदतीने गुप्तरीत्या काम करीत असल्याचेही दोषारोपपत्रात नमूद आहे.

गणपती अद्याप फरार
गणपती हा सीपीआय (माओवादी) या संघटनेचा सचिव असून तो फरार आहे, तर इतर ४ आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. गेल्या महिन्यात आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना संरक्षण दिले. सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार या खटल्याचा तपास करीत आहेत. 

Web Title: five accused in connection with Maoists