पुण्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी पानशेत, गुंजवणी, भामा आसखेड, चासकमान आणि खडकवासला ही पाच धरणे शनिवारी (ता. 3) सायंकाळी "फुल' भरली आहेत. वरसगाव, पवना, मुळशी, भाटघर, नीरा-देवघर, वीर, येडगाव आणि डिंभे या आठ धरणांनी पाणीसाठ्याचा 90 टक्‍क्‍यांचा टप्पा पार केला. त्यातही यापैकी काही धरणे 100 टक्‍क्‍यांच्या जवळ पोचली आहेत. दरम्यान, उजनी धरण अद्यापही निम्म्याहून कमीच आहे. उजनीत आजअखेर 19.42 टीएमसी (36.25 टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

आठ धरणांनी पार केला 90 टक्‍क्‍यांचा टप्पा 

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी पानशेत, गुंजवणी, भामा आसखेड, चासकमान आणि खडकवासला ही पाच धरणे शनिवारी (ता. 3) सायंकाळी "फुल' भरली आहेत. वरसगाव, पवना, मुळशी, भाटघर, नीरा-देवघर, वीर, येडगाव आणि डिंभे या आठ धरणांनी पाणीसाठ्याचा 90 टक्‍क्‍यांचा टप्पा पार केला. त्यातही यापैकी काही धरणे 100 टक्‍क्‍यांच्या जवळ पोचली आहेत. दरम्यान, उजनी धरण अद्यापही निम्म्याहून कमीच आहे. उजनीत आजअखेर 19.42 टीएमसी (36.25 टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

दरम्यान, शनिवारी भामा आसखेड, पवना, गुंजवणी, खडकवासला, डिंभे आणि मुळशी धरणांतून पाणी सोडण्यात आले. भामा आसखेडमधून 3246 क्‍युसेक, गुंजवणीतून 3770, डिंभे धरणातून 15 हजार 600; तर मुळशी धरणातून 20 हजार क्‍युसेक, पवनातून 5400; तर खडकवासलातून 27 हजार 203 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. 

चालू पावसाळ्यात जून आणि जुलै हे दोन महिने कोरडेच गेले होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडू लागला. शिवाय धरणक्षेत्रातही मोठा पाऊस होत असल्याने, दिवसेंदिवस धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याचे सिंचन भवनातून सांगण्यात आले. 

कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाच्या साठ्यात अद्याप फारशी वाढ झालेली नाही. या धरणाचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी सहापर्यंत 5.02 टीएमसी झाला. पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे 49.33 टक्के एवढे आहे. 

तीन धरणे 90 टक्‍क्‍यांच्या आत 
टेमघर, वडज आणि घोड ही तीन धरणे अद्यापही 90 टक्‍क्‍यांच्या आत आहेत. टेमघरचा साठा 3.06 टीएमसी (82.53 टक्के) झाला आहे. मात्र घोड अद्यापही 70 टक्‍क्‍यांच्या; तर वडज 80 टक्‍क्‍यांच्या आतच आहे. घोडमध्ये आजअखेर 3.40 टीएमसी (62.20 टक्के) आणि वडजमध्ये 0.84 टीएमसी (71.64 टक्के) पाणीसाठा झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five dams overflow in Pune