पाचशेच्या नव्या नोटा आल्या!  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे, हजारच्या नोटाबंदी केल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नव्या नोटांची उत्सुकता पुणेकरांना होती. ही उत्सुकता गुरुवारी संपली. दैनंदिन व्यवहारासाठी पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आयडीबीआय बॅंकेमार्फत नागरिकांच्या हाती पडल्या, तेव्हा नागरिक आणि बॅंक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तसेच ‘आता व्यवहार सुरळीत होतील !’ अशीच प्रतिक्रिया सर्वांकडून उमटत होती. उद्या (ता. २५) शहरातील काही राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्येही पाचशेच्या नव्या नोटा नागरिकांना उपलब्ध होतील. 

पुणे - पाचशे, हजारच्या नोटाबंदी केल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नव्या नोटांची उत्सुकता पुणेकरांना होती. ही उत्सुकता गुरुवारी संपली. दैनंदिन व्यवहारासाठी पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आयडीबीआय बॅंकेमार्फत नागरिकांच्या हाती पडल्या, तेव्हा नागरिक आणि बॅंक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तसेच ‘आता व्यवहार सुरळीत होतील !’ अशीच प्रतिक्रिया सर्वांकडून उमटत होती. उद्या (ता. २५) शहरातील काही राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्येही पाचशेच्या नव्या नोटा नागरिकांना उपलब्ध होतील. 

रिझर्व्ह बॅंकेमार्फत पुण्यातील काही राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांच्या करन्सी चेस्टला पाचशेच्या नव्या नोटांचा पुरवठा करण्यात आला. बॅंकांकडे पाचशेच्या नव्या नोटा आल्याची बातमी शहरात गुरुवारी सकाळीच वाऱ्यासारखी फिरली, तेव्हा चलनात आलेल्या नव्या नोटा पाहण्यासाठी खातेदारांनीही संबंधित बॅंकांच्या शाखांकडे धाव घेतली. पाचशेची नोट कोणत्या रंगाची आहे, हाताळायला कशी आहे, आकाराने लहान की मोठी, या प्रश्‍नांची उत्सुकता नागरिकांमध्ये होती. मात्र रोजच्या व्यवहाराकरिता दोन हजारांपेक्षा पाचशेची नोट केव्हाही सोईस्कर आहे, त्यामुळे नोटांसाठी खातेदारांनी बॅंकांच्या शाखांमध्ये हजेरी लावली. आनंदी मूड मध्ये आलेले नागरिक दोन हजार नको मात्र पाचशेचीच नोट द्या, असे त्यांच्या खास शैलीत बॅंक कर्मचाऱ्यांना सांगत होते. तब्बल दोन आठवडे अहोरात्र नागरिकांच्या सेवेत असलेले बॅंक कर्मचारीही उत्साही मूड मध्ये होते. दैनंदिन व्यवहार करणे सोपे होणार असल्याने बॅंक कर्मचारीही नागरिकांच्या प्रश्‍नांना आनंदाने उत्तरे देत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आयडीबीआय बॅंक (एक कोटी), महाराष्ट्र बॅंकेकडे (सव्वा कोटी) पाचशेच्या नवीन नोटा आल्या. उद्या (ता. २५) बॅंकांच्या विविध शाखांमध्ये या नोटा नागरिकांसाठी उपलब्ध होतील, असे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडे शुक्रवारी (ता. २५) येणार असल्याचे समजते.

रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना गेल्या दोन आठवड्यांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांचाच सर्वाधिक पुरवठा करण्यात येत होता. रोजच्या येणाऱ्या भरण्यातही (डिपॉझिट) दहा ते शंभर रुपयांच्या नोटांचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांहूनही कमी होते. परिणामी सुटे पैसे देण्याकरिता बॅंकांचीच कोंडी होत होती. ज्या बॅंकांकडे पाचशेच्या नव्या नोटा आल्या. तेथे आनंदाचे वातावरण होते; पण बहुतांश बॅंकांकडे अद्यापही पाचशेच्या नव्या नोटा आलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना मात्र चलनवलनाच्या अडचणींना तोंड द्यावे लागले. करन्सी चेस्टकडून पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध होऊ न शकल्याने काही बॅंकांकडे दहा ते शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा होता. पैसे नसल्याने एटीएम केंद्रेही बंद ठेवावी लागली, तर नागरिकांच्या हाती दोन हजार रुपयांचीच नोट ठेवावी लागली. काही राष्ट्रीयीकृत बॅंकांना सकाळी तर काही बॅंकांना सायंकाळी पाचशेच्या नव्या नोटांचा पुरवठा झाला. 

नागरिकांची गर्दी हळूहळू ओसरू लागल्याचे बॅंक आणि टपाल खात्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पेट्रोल पंपावरही अखेरचा दिवस असल्याने पाचशे, हजारच्या जुन्या नोटा रात्री बारावाजेपर्यंत स्वीकारण्यात येत होत्या. 

एटीएममध्येही आज नव्या नोटा 
 शहरातील विविध बॅंकांच्या एटीएममध्ये पाचशेच्या नव्या नोटा शुक्रवारी (ता. २५) उपलब्ध होतील. काही बॅंकांना चौथ्या शनिवारी आणि रविवारी सुटी आहे, त्यामुळे पुढील आठवड्यापासून बहुतांश बॅंकांकडे पाचशेच्या नव्या नोटा उपलब्ध होतील. त्यामुळे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये नागरिकांचे जनजीवनही पूर्वपदावर येईल, असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: five hundred new notes