Coronovirus : नायडू रुग्णालयाच्या पाच परिचारीका कोरोनाग्रस्त 

Coronovirus : नायडू रुग्णालयाच्या पाच परिचारीका कोरोनाग्रस्त 

पुणे - कोरोनाच्या रुग्णांवर सलग दोन महिने उपचार करावे लागल्यामुळे नायडू सांसर्गिक रुग्णालयातील पाच परिचारीकांना कोरोनाची लागन झाल्याचे उघडकीस आले आहे. उपचार करताना राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन प्रशासन करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

कोरोनाचे सुमारे 150 रुग्ण असलेल्या नायडू रुग्णालयात महापालिकेच्या सेवेतील कायम आणि कंत्राटी अशा सुमारे 35 तर, अन्य विभागांतून आलेल्या 35 परिचारीका आहेत. त्यातील 57, 42, 38, 36 आणि 35 वर्षांच्या पाच परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्यांना "नायडू'मध्येच ठेवण्यात आले आहे. त्यातील सोनावणे रुग्णालयातीलही एक परिचारीका तेथे होती. परंतु, त्यांना नुकतेच एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पाचही परिचारीकांची प्रकृती सुदैवाने सुधारत आहे. 

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीका आणि डॉक्‍टरांना सात दिवस कोरोना वॉर्ड, सात दिवस नॉन कोरोना वॉर्ड आणि सात दिवस होम क्वारंटाईन करायचे, असा राज्य सरकारचा आदेश आहे. मात्र, त्याचे नायडू रुग्णालयात पालन होत नसल्याचे डॉक्‍टर आणि परिचारीकांचे म्हणणे आहे. या बाबत त्यांनी रुग्णालय अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते यांच्याकडे पत्रही दिले आहे. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. सलग ड्यूटी दिल्यामुळेच आम्हाला कोरोना झाल्याचे परिचारिकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. "नायडू'मध्ये तीन शिफ्ट आहेत. तळ मजलल्यावर ओपीडी आहे. पहिल्या मजल्यावर संशयितांची तपासणी होते तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार होतात. तेथे काम करणाऱ्या पाच परिचारीका गेल्या दहा दिवसांत "पॉझिटिव्ह' झाल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

निवासाची व्यवस्था नाहीच 
कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्‍टर आणि परिचारीकांच्या निवासाची व्यवस्था त्याच रुग्णालयाच्या आवारात किंवा नजिकच्या ठिकाणी करायची, असा ही आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार तेथील बारा डॉक्‍टरांना जुन्या विश्रामगृहातील चार खोल्या राहण्यास देण्यात आल्या. परंतु, तेथे सुविधा नसल्यामुळे डॉक्‍टरांनी तेथे राहण्यास नकार दिला. महापालिकेने काही हॉटेलमध्ये डॉक्‍टरांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात हॉटेलच्या खोल्या उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे रोजची ड्यूटी संपवून डॉक्‍टर आणि परिचारीकांना घरी जावे लागत आहे. 

"धावपळीत झालेली चूक भोवते' 
पॉझिटिव्ह झालेल्या परिचारीकांपैकी एकजण म्हणाल्या, ""सलग दोन महिने कोरोना वॉर्डात आम्हाला ड्यूटी देण्यात आली. एका वॉर्डमध्ये 30 ते 36 पेशंट असतात. तेथे किमान 5 परिचारीका हव्यात. परंतु, दोन किंवा तीन परिचारीकांवर जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे आमची धावपळ होते आणि त्या धावपळीतच काही तरी चूक होते अन ती भोवते.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्ही कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर आमच्या घरच्यांची तपासणी केली गेली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आम्ही त्यांना गावाकडे पाठविले आहे. त्यांना आमची सतत काळजी वाटते. आमच्या मुला-मुलींना आम्हाला भेटायला यायचे आहे. परंतु, आम्ही त्यांना येथे येऊ देत नाहीत. त्यामुळे आम्ही पाचजणीच आमची परस्परांची काळजी घेतो, असे एका परिचारीकेने सांगितले. 

यातील तीन परिचारीका भाडेतत्त्वावर राहतात. त्या पॉझिटिव्ह झाल्यावर त्यांच्या घरमालकाने त्यांना घर सोडण्यास सांगितले आहे. आम्ही सध्या घरी परतणार नाही, असे घरमालकांना सांगितले तरी त्यांचा हेका कायम आहे, त्यामुळे आमची अडचण झाली आहे, असेही त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

काही परिचारीका, डॉक्‍टरांना पिंपरी चिंचवड, दिघी, औंध इतक्‍या लांबवरून ये-जा करावी लागत आहे. अनेकांच्या वाहतुकीचीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. सरकार सांगते एक आणि येथे घडते भलतेच, असाही अनुभव एका परिचारीकेने सांगितला. 

आम्हीला किती दिवस येथे रहावे लागेल, याची खात्री नाही. इथले जेवण घेण्याऐवजी आम्हाला आमच्या काही सहकारी डबे घेऊन येतात, तेवढाच आम्हाला विरंगुळा मिळत आहे, असेही एका परिचारीकेने सांगितले. 

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रोटेशन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे ते शक्‍य नाही. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायचे असले तरी स्थानिक परिस्थितीनुसार त्या बाबत निर्णय घेतला जातो. 
- डॉ. सुधीर पाटसुते, अधीक्षक, नायडू रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com