पुण्यात पुन्हा लॉकडाउन; वाचा 5 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 10 जुलै 2020

लॉकडाउन दहा दिवसांचा असणार आहे. तसेच या काळातही सेवा, सुविधांबाबत टप्प्या टप्प्याने निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरला होता. त्यामुळेच राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. अर्थात हा लॉकडाउन दहा दिवसांचा असणार आहे. तसेच या काळातही सेवा, सुविधांबाबत टप्प्या टप्प्याने निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लॉकडाउनबाबत आज सकाळपासून, अफवांचे पिक जोमाने आले होते. त्यामुळे प्रशासनालाही त्याची दखल घेऊन, निर्णयांची सविस्तर माहिती द्यावी लागली. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंगटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डिकर, पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन, लॉकडाउनची माहिती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्या सुविधा सुरू राहणार?
पुण्यातील दहा दिवसांचा लॉकडाउन कडकडीत असणार आहे. त्याकाळात पहिल्या पाच दिवसांत भाजीपाला आणि किराणा दुकाने बंद असतील. केवळ दूध आणि मेडिकल स्टोअर्स तसेच दवाखाने सुरू असतील, असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 

एमआयडीसीत काय होणार?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योगधंदे सुरू झाले आहेत. पण, नव्या लॉकडाउनमध्ये हे एमआयडीसीतील उद्योग बंद राहणार आहेत. पिंपरी-चिंचवड, भोसरी एमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेशी संबंधित उद्योगच सुरू राहतील, असे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा - पुण्याच्या महापौरांना मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

पास सुविधा असणार?
लॉकडाउन काळात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडायचे असल्यास पोलिस आणि प्रशासनाकडून पासची सुविधा पुरवण्यात येणार आहे. या पासशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही.

अत्यावश्यक वस्तूंची खरेदी?
अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने नागरिकांना दोन दिवसांचा अवधी दिला आहे. येत्या दोन दिवसांत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी लागणार आहे. कारण लॉकडाउन काळात भाजी, किराणा मिळणार नसल्याने नागरिकांना दोन दिवसांत, पुढील दहा दिवसांसाठी लागणारे किराणा साहित्य खरेदी करायचे आहे.

आणखी वाचा - तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध वाचा सविस्तर बातमी

लॉकडाउनचा कार्यकाळ?
पुण्यात येत्या सोमवारी 13 जुलैच्या रात्रीपासून पुन्हा लॉकडाउनला सुरुवात होईल. हा लॉकडाउन 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. या दहा दिवसांत टप्प्या टप्प्याने लॉकडाउनमधील सेवा सुविधा पुन्हा सुरू करण्याविषयी निर्णय घेतला जाईल. 23 जुलैच्या आधीच लॉकडाउन पुन्हा वाढणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five points pune lock down from 13th july