व्हॉट्सअॅपमुळे सापडली 'ती' चिमुकली!

Whatsapp_Janhavi
Whatsapp_Janhavi

हडपसर (पुणे) : पाच वर्षांची हरवलेली चिमुकली गुरुवारी व्हॉट्सअॅपच्या मदतीमुळे तिच्या आईच्या कुशीत विसावली. तंत्रज्ञानाचा सदुपयोग दाखवून देणारी ही घटना हडपसर भागातील काळेपडळ या भागात घडली.

काळेपडळ भागात पाच वर्षांची चिमुकली बुधवारी (ता.१६) रात्री दहा वाजल्याच्या सुमरास हंबीरराव कांबळे यांना त्यांच्या घरासमोर रडत असलेली दिसली. कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीला तिचे नाव आणि पत्ता विचारला. मात्र, ते तिला सांगता आले नाही. त्यामुळे कांबळे यांनी रात्री दोन वाजेपर्यंत काळेपडळ भागातील गल्लोगली फिरून मुलीच्या घरच्यांचा शोध घेतला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर रडत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांचा शोध लागावा म्हणून कांबळे यांनी रात्री महंमदवाडी पोलिस चौकीला फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगितली. पोलिस घटनास्थळी पोहचले, मात्र मी एकटाच ड्युटीवर आहे, तसेच कोवीडचा संसर्ग होवू नये म्हणून मुलीला रात्रभर तुमच्या घरीच सुरक्षित ठेवा, असे पोलिसाने सांगितले. 

दरम्यान हरवलेल्या मुलीचा फोटो आणि तिचे वर्णन सामजिक कार्यकर्ते राकेश वाघमारे यांनी व्हॅाट्सअॅप ग्रुपवर आणि युट्युब चॅनेलवर टाकले आणि संपर्क साधण्याचे आवाहन केले. पाठवलेला तो मेसेज मुलीच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता महंमदवाडी पोलिस चौकीत धाव घेतली. त्यानंतर कांबळे महंमदवाडी पोलिस ठाण्यात मुलीला घेऊन गेले, तेथे मुलीचे आई-वडील आले होते. आई-वडिलांना पाहताच मुलगी आईच्या कुशीत विसवली. मुलगी हरवल्यामुळे भयभीत झालेल्या पालकांना आपल्या मुलीला पाहताच डोळ्यांमधून आनंदाश्रू ओघळले.

जान्हवी अशोक घोडके असे या मुलीचे नाव असून ती हांडेवाडी रोडवरील आदर्शनगर येथील असल्याचे चौकशीअंती समजले. चिमुरडीला आईच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केल्याने स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी काबंळे यांचे अभिनंदन केले. हंबीरराव कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री आणि सकाळी जान्हवीला जेवण-नाष्टा दिला आणि तिची काळजी घेतली. तसेच सकाळी नवीन कपडे दिले. त्यामुळे आजच्या युगातही माणुसकी टिकून आहे, याचा प्रत्यय आला.

याबाबत हंबीरराव कांबळे म्हणाले, ''जान्हवी आमच्या मुलीप्रमाणेच आहे. त्यामुळे तिची आमच्या कुटुंबीयांनी खूप काळजी घेतली. तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मदत केली. तसेच पोलिसांचेही चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे.''

जान्हवीचे वडील अशोक घोडके म्हणाले, ''आमची मुलगी खेळता खेळता भरकटली. ती काळेपडळ येथे कशी गेली, ते आम्हाला देखील सांगता येत नाही. मात्र, कांबळे यांच्या प्रयत्नामुळेच ती आम्हाला सुखरूप परत मिळाली. त्यामुळे मी वाघमारे, कांबळे आणि पोलिसांचा अभारी आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com