पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

‘सकाळ’तर्फे खास यंत्रणा
फंडाच्या वतीने आतापर्यंत कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये पाठविण्यात आलेली मदत गरजू कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सकाळ’तर्फे खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या भागातील नागरिकांचे संसार उभे करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहनही ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे - पुरामुळे उद्‌ध्वस्त झालेले हजारो संसार उभे करण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. फंडाकडे आत्तापर्यंत पावणेदोन कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’ने पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून पिण्याचे पाणी, औषधे, जीवनावश्‍यक वस्तू, अन्नधान्य आदींचे दहा ट्रक पूरग्रस्त भागात पाठविले आहेत. 

कोल्हापूर, सांगली आणि परिसरात पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली होती. कोल्हापूर आणि सांगली या दोन शहरांचे पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या आपत्तीत अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, नागरिकांना सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’ने यासाठी पुढाकार घेतला आहे. फंडाने स्वतःची एक कोटी रुपये मदत या कामासाठी यापूर्वीच जाहीर केली आहे. याशिवाय नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार आतापर्यंत ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे राज्यभरातून एक कोटी ८२ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यात पुणे शहराचा वाटा सर्वाधिक आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी विद्यार्थी, गणेश मंडळे, व्यापारी, पेन्शनर, विविध सामाजिक संस्था-संघटना, व्यापारी, उद्योजक, बॅंका, पतसंस्था आदींनी पुढाकार घेतला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Sakal Relief Fund Help