पंढरपुरात पुर ओसरण्यास सुरुवात;भीमा नदी दुथडी भरुन वाहणार

ज्ञानेश्‍वर बिजले 
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पंढरपूर शहरातील काही भागात काल रात्री शिरलेले पुराचे पाणी सकाळपासून ओसरण्यास सुरवात झाली. काही सखल भाग वगळता आज सायंकाळपर्यंत भीमा नदीपात्रातून पुराचे पाणी वाहण्यास सुरवात होईल. मात्र, दोन लाख घनफूट प्रतिसेकंद (क्‍युसेक) हे पुराच्या पाण्याचे प्रमाण आणखी दोन तीन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

पुणे : पंढरपूर शहरातील काही भागात काल रात्री शिरलेले पुराचे पाणी सकाळपासून ओसरण्यास सुरवात झाली. काही सखल भाग वगळता आज सायंकाळपर्यंत भीमा नदीपात्रातून पुराचे पाणी वाहण्यास सुरवात होईल. मात्र, दोन लाख घनफूट प्रतिसेकंद (क्‍युसेक) हे पुराच्या पाण्याचे प्रमाण आणखी दोन तीन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

पंढरपूर शहराच्या विविध भागात नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास काल सकाळपासून सुरवात झाली. उजनी व वीर धरणांतून सोडलेले सुमारे दोन लाख 55 हजार क्‍युसेक पाणी भीमा नदीच्या प्रवाहातून शहराच्या विविध भागात शिरू लागले. मध्यरात्री दीडच्या सुमाराला घोंगडे गल्ली, संतपेठ यांसह अनेक भागात रस्त्यावर दीड ते दोन फूट उंचीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली. त्यानंतर, सकाळी आठ वाजेपर्यंत त्यात वाढ झाली नाही. 

पूरनियंत्रण करण्यासाठी जलसंपदा अधिकारी पूर्ण प्रयत्न करीत होते. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे, उजनी धरणाच्या जलाशयात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटले. त्यामुळे, काल सायंकाळपासून उजनीतून सोडण्याचे येणारा विसर्ग कमी करण्यात आला. मात्र, नीरा खोऱ्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने, वीर धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात आला. 

उजनीतून आज सकाळी नऊ वाजता एक लाख वीस हजार क्‍युसेक, वीरमधून 62 हजार 173 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. नीरा नरसिंहपूर येथे एक लाख 93 हजार क्‍युसेक वेगाने पाणी वाहात असून, पंढरपूर येथील पुराच्या पाण्याचा प्रवाह दोन लाख 49 हजार क्‍युसेक आहे. 

पुण्याचे जलसंपदा विभाहाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे म्हणाले, "पंढरपुरातील पुराचा प्रवाह आज दुपारी चार-पाचपर्यंत दोन लाख क्‍युसेकपर्यंत कमी होईल. तेवढे पाणी भीमा नदीच्या पात्रात सामावू शकते. वीर धरणातून साठ हजार ते एक लाख क्‍युसेक वेगाने, तर उजनीतून सरासरी सव्वा लाख क्‍युसेक वेगाने प्रवाह पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, पुढील दोन-तीन दिवस पंढरपुरातून सरासरी दोन लाख क्‍युसेक वेगाने पाणी वाहात जाईल. घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण वाढल्यास, धरणातून विसर्ग वाढवावा लागेल. '' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flood level reducing at Pandharpur