Video : पूरस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 43 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पूरस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मृतांची संख्या वाढून एकूण 43 झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परंतु सध्या तेथे पाऊस नसून, पुराच्या पाण्याची पातळी ओसरत आहे, अशी माहिती विभागीय डॉ. आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : पूरस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मृतांची संख्या वाढून एकूण 43 झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परंतु सध्या तेथे पाऊस नसून, पुराच्या पाण्याची पातळी ओसरत आहे, अशी माहिती विभागीय डॉ. आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पावणेपाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना उद्यापासून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला रोख पाच हजार रुपये आणि उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असून, अत्यावश्यक वस्तू पोचविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच, सकाळपासून औषधे, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि पाण्याचे टँकर सांगली आणि कोल्हापूर शहरात पाठविण्यात येत आहेत. पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, तेथे रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता मोहिमेचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे काही बँकांचे एटीएम सेंटर पाण्यात गेले होते. 313 एटीएम सेंटर सुरू करण्यात आले असून, एटीएम सेंटरमध्ये 25 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.

कोयना धरणात 44 हजार 157 क्यूसेकने आवक सुरू असून 53 हजार 882 विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टी धरणात सहा लाख 11 हजार 990 क्यूसेकने येवा सुरू असून, 5 लाख 70 हजार 121 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराच्या पाणीपातळीत घट होत आहे. परंतु कोल्हापूर येथील पाणीपातळी पाच फुटांनी तर सांगली येथील पाणीपातळी धोका पातळीपेक्षा पाच फूट दोन्ही इंचांनी अजूनही जास्त आहे.

प्रत्येक कुटुंबाला टुथपेस्ट, ब्रश, साबण, गव्हाचे पीठ, तांदूळ मसाले असे संसारोपयोगी साहित्य असलेल्या कीटचे वाटप करण्यात येणार आहे. स्थलांतरित कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांना या कीटचे वाटप करण्यात येईल. परिवहन विभागाकडून एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 31 पैकी 15 मार्गावर तर सांगली जिल्ह्यातील 45 पैकी 15 मार्गावर एसटीची वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. बंद पडलेले रस्ते आणि पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी करूनच ते रस्ते आणि पूल सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, सरकारी कार्यालयांच्या इमारती आणि घरांची पडझड झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पाणीपुरवठा
कोल्हापूर शहरात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात उद्यापासून नळाने पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. तसेच, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तेथून सांगली शहरालाही पाणी देण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods kill 43 in western Maharashtra