'त्या'च पुलाने यावर्षीही केला घात; जीव वाचवण्यासाठी नागरिक पोचले घराच्या छतावर!

निलेश बोरुडे
Thursday, 15 October 2020

किरकटवाडी गावठाण आणि शिवनगर येथील मावळे आळी या भागाला जोडणारा एक कमी उंचीचा अरुंद लोखंडी पूल काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. मावळे आळी येथील वीस ते पंचवीस घरांसाठी हा एकमेव रस्ता आहे.

किरकटवाडी (पुणे) : किरकटवाडी (ता.हवेली) येथील ओढ्याला आलेले पुराचे पाणी शिवनगर भागातील अनेक घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमी उंचीच्या लोखंडी पुलाला पाण्याबरोबर वाहत आलेली झाडे अडकल्याने ही दुर्घटना घडली. नागरिकांना आपला जीव वाचविण्यासाठी कित्येक तास घराच्या छतावर बसून राहावे लागले.

Pune Rain : २५ सप्टेंबरची पुनरावृती टळली; यंदा जास्त पाऊस होऊनही नुकसान कमीच​

किरकटवाडी गावठाण आणि शिवनगर येथील मावळे आळी या भागाला जोडणारा एक कमी उंचीचा अरुंद लोखंडी पूल काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. मावळे आळी येथील वीस ते पंचवीस घरांसाठी हा एकमेव रस्ता आहे. मागील वर्षी 25 सप्टेंबर 2019 रोजी किरकटवाडी व परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मावळे आळी येथील याच लोखंडी पूलाला पाण्याबरोबर वाहत आलेली झाडे अडकून अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. तेरा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. प्रशासनाने ही घटना टाळण्यासाठी एक वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न केल्यामुळे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुन्हा अनेक घरांचे नुकसान झाले.

घराचं स्वप्न पूर्ण करण्याकडं खरेदीदारांचा मोर्चा; विक्रीत झाली मोठी वाढ!

पूर्णपणे पाण्याने वेढलेले नागरिक घराच्या छतावरून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत होते. पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मावळे आळीच्या समोरील संरक्षक भिंत तोडून तुंबलेले पाणी काढून दिले.

"आमच्या रस्त्याच्या समस्येबाबत अधिकारी आणि पदाधिकारी कोणीही दखल घेत नाही. ओढ्याचे पाणी शिरल्यानंतर आम्हाला बाहेर पडण्यासाठी कोणताही रस्ता नाही. दोन दोन महिन्यांच्या लहान बाळांना घेऊन आम्हाला जीव मुठीत धरुण छतावर जाऊन थांबावे लागत आहे. प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहत आहे काय?"
- अतुल गायकवाड, रहीवासी, मावळे आळी, किरकटवाडी.

"किरकटवाडीत नाल्याच्या नैसर्गिक पाणी प्रवाहाला अडवून बेकायदेशीर अरूंद आणि कमी उंचीचा पूल बांधल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना आणि सोसायट्यांना पूरपरिस्थितीच्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची ग्रामपंचायतीने दखल घ्यावी."
- भाऊसाहेब हगवणे, ग्रामस्थ, किरकटवाडी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: floodwater had inundated several houses in Shivnagar area due to trees getting stuck in bridge