Video : कधीही न कोमेजणाऱ्या फुलांचा बहर

अमृता मातवणकर व तिची पुष्पसृष्टी
अमृता मातवणकर व तिची पुष्पसृष्टी

 त्या फुलांना कोमेजणं माहीत नाही. त्या फुलांचा बहर कधी संपत नाही. ती फुलं विशिष्ट ऋतुमानापुरती नसतातच. ती हवी तेव्हा उपलब्ध करता येतात. ती आहेत कागदाची फुलं. मात्र हातात घेईपर्यंत अगदी खरीच वाटणारी. बेंगळुरूमधील अमृता मातवणकर ही फुलं बनवते. तिच्या घरातील विविध जागा, तिने साकारलेल्या फुलांनी व्यापल्या आहेत. 

बिट्टीची पिवळी फुलं किती वेगळी दिसतात ना? निशिगंधाचा निराळाच बाज आणि कुंदाच्या इवल्याशा फुलांचं सौंदर्य काही औरच. अशी किती तरी देशी-विदेशी वाणाची फुलं बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या अमृता मातवणकरच्या बाल्कनी व घरात जागोजागी लक्ष वेधताना दिसतात. अमृता म्हणाली, ‘‘सात-आठ वर्षांपासून मी ही फुलं तयार करते. क्रेप, टिश्‍यू व सोलावुड पेपर वापरून तऱ्हेतऱ्हेची फुलं बनवताना एकाग्रता लागते. छोट्याशा कुंदाच्या फुलाची निर्मिती करायलाही मेहनत लागते. गुंतागुंतीची रचना असलेलं एक फूल बनवायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात. गंमत वाटेल, पण गुलाबाचं फूल तयार करणं तेवढंसं अवघड नाही. मात्र साधंसं दिसणारं जास्वंदफूल बनवायला जास्त वेळ लागतो. इंग्लिश व देशी गुलाब या दोन्ही व्हरायटी मी बनवते. झेंडू, गुलबक्षी, बहावा, पांढरा चाफा, शेवंती व बिट्टीची पिवळी फुलं करायला मला खूप आवडतात.’’

अमृताने असंही सांगितलं की, पूर्वी मी शास्त्रीय संगीत शिकले. मध्यंतरी ते मागं पडलं. परंतु कागदाची फुलं करताना मला अनेकदा फुलांचा किंवा ऋतूंचा उल्लेख असलेल्या बंदिशी आठवतात. त्यातल्या शब्द व स्वरांची गुंफण विचार करायला भाग पाडते. मी एकेक पाकळी जोडत, तिला वळण देत हलके-हलके पूर्ण फूल, नंतर त्याचे गुच्छ व हार बनवते. यांतली गुंफणही मला एखाद्या बंदिशीचं आकलन नव्याने करून देते. नातेवाईक व मित्रमैत्रिणी हमखास माझ्याकडे त्यांच्या आवडीच्या फुलांची फर्माईश करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com