अमेरिकेसाठी ‘फ्लाय फ्रॉम दिल्ली’चा ट्रेंड

अमेरिकेसाठी ‘फ्लाय फ्रॉम दिल्ली’चा ट्रेंड

पुणे - अमेरिका किंवा युरोपात जायचे असेल, तर शहरातील प्रवासी आता मुंबईऐवजी दिल्ली, बंगळूर, हैदराबादमार्गे जाऊ लागले आहेत. मुंबईमार्गे जाताना सुमारे आठ तास जास्त प्रवास करावा लागतो. तुलनेने तो वेळ वाचत असल्यामुळे ‘फ्लाय फ्रॉम दिल्ली’चा ट्रेंड परदेशी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये रुजतो आहे. 

पुण्याहून अमेरिकेतील विविध शहरांत, तसेच युरोपमधील देशांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. दिल्ली, बंगळूर, हैदराबादमार्गे जाताना तिकीट खर्चात फारसा फरक पडत नाही. तीन महिने अगोदर तिकीट आरक्षित केले, तर मुंबईपेक्षा ते स्वस्त पडते, त्यामुळेही हा ट्रेंड वाढता आहे, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुणे- मुंबई अंतर ४ तासांचे असले तरी घाटात वाहतूक कोंडी असू शकते, त्यामुळे दोन तासांचे मार्जिन प्रवासी हाती ठेवतात. तसेच, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानतळावर किमान २-३ तास अगोदर पोचणे बंधनकारक आहे, त्यामुळे मुंबईमार्गे जाताना ८-९ तासांचा वेळ जातो. तसेच, द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्या वाढत असल्यामुळे प्रवाशांमध्ये त्याची धास्ती वाढत आहे. या प्रवासाचा थकवा आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुंबई टाळून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

अमेरिका २४ तासांत शक्‍य 
शिकागो, सॅनफ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आदी शहरांतून दिल्लीसाठी नुकतीच थेट विमानसेवा सुरू झाली आहे. दिल्लीवरून पुण्याचा प्रवास दोन तासांचा असून, त्यासाठी मुबलक पर्यायही आहेत. तसेच हैदराबाद, बंगळुरूचेही आहे. त्यामुळे अमेरिकेतून २४ तासांत पुण्यात पोचणे शक्‍य आहे. एरवी या प्रवासाला सुमारे ३० ते ३८ तास लागू शकतात. 

दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूवरून इंटरनॅशनल कनेक्‍शनची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांना बहुविध पर्याय उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे अमेरिकाच नव्हे, तर युरोपसाठीही याच शहरांचा वापर सुरू झाला आहे. 
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

सॅनफ्रॅन्सिस्कोवरून थेट फ्लाइट सुरू झाल्यामुळे २४ तासांत पुण्यात पोचणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे दिल्लीचा ऑप्शन वापरून मी प्रवास करतो.  त्यामुळे मुंबईसाठीचे आठ तास वाचत असल्यामुळे हा वेळ मोलाचा ठरतो. 
- शार्दूल वेळापुरे,  संगणक अभियंता, अमेरिका

अनेक ज्येष्ठ नागरिक अमेरिकेला जाण्यासाठी पुण्यातूनच जातात. जेट, एअर इंडियाची कनेक्‍टिव्हिटी चांगली आहे. ‘एतेहाद’मुळे आता अबुधाबीमार्गे अमेरिकेला जाण्याचाही पर्याय निर्माण झाला आहे. 
नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हलर एजंट्‌स असोसिएशन, पुणे

सुमारे १५ हजार - मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या दरमहा गाड्या 
सुमारे १० हजार - दरमहा अमेरिकेला जाणाऱ्यांचे प्रमाण
८० लाख - पुणे विमानतळावरील प्रवाशांची वार्षिक संख्या 
सुमारे २ लाख - आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जाणाऱ्यांची वार्षिक संख्या
सुमारे १० टक्के - दिल्ली, हैदराबाद, बंगळूरमार्गे जाणारे प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com