आम्ही फक्त ‘एनओसी’ देऊ; पैसा नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

 गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाण पूल पाडण्यासाठी आम्ही केवळ ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देऊ; पण नवीन दुमजली उड्डाण पूल बांधण्यासाठी पैसा देणार नाही. त्याचवेळी उड्डाण पूल पाडण्याऐवजी दुसऱ्या पर्यायाचाही विचार करणे गरजेचे आहे, अशी भूमिका महापालिकेने  घेतली आहे.

पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाण पूल पाडण्यासाठी आम्ही केवळ ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देऊ; पण नवीन दुमजली उड्डाण पूल बांधण्यासाठी पैसा देणार नाही. त्याचवेळी उड्डाण पूल पाडण्याऐवजी दुसऱ्या पर्यायाचाही विचार करणे गरजेचे आहे, अशी भूमिका महापालिकेने  घेतली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील एका कार्यक्रमात दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाण पूल चुकीचे बांधले आहेत, ते पाडावे लागतील, असे वक्तव्य केले होते. याविषयी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

‘पीएमआरडीए’कडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम केले जाणार आहे. हा मेट्रोमार्ग गणेशखिंड रस्त्यावरून जात आहे. विद्यापीठ चौक आणि शिवाजीनगर येथे असे दोन उड्डाण पूल या मार्गावर आहेत. ते मेट्रो मार्गासाठी पाडावे लागणार आहेत. याविषयी आयुक्त गायकवाड म्हणाले, ‘‘मेट्रोसाठी हे पूल पाडण्याचे विचाराधीन आहे. मेट्रोचे काम करताना दुमजली उड्डाण पूल बांधावे, अशी कल्पना मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीकडून मांडण्यात आली होती. महापालिकेने पुलाचे काम पूर्ण केले आहे. ते पाडण्यापासून उभारणीपर्यंतचा खर्च हा मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीला करावा लागणार आहे. यासाठी अंदाजे सातशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.’’

पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज

विद्यापीठाच्या गेटची जागा बदलली तर... 
पूल पाडल्यानंतर पुन्हा बांधण्यासाठी अडीच ते तीन वर्षे लागतील. या काळात येथील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराची जागा बदलली, तर काही प्रमाणात येथील वाहतुकीचा प्रश्न कमी होऊ शकतो, अशा इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे, असे गायकवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flyover Ganeshkhind road pune