गवत व पाण्याअभावी चिंकारांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - खायला गवत नाही, की प्यायला पाणी ! अशी अवस्था पुणे जिल्ह्यातील चिंकारा हरणांची झाली आहे. टणाटण उड्या मारत फिरणारी ही हरणे अशक्त झाली आहेत. त्यांच्या हालचाली मंदावल्यात. यंदाच्या या दुष्काळात वन्यजीवांना जगविण्याचे मोठे संकट वन खात्यावर कोसळले आहे.

पुणे - खायला गवत नाही, की प्यायला पाणी ! अशी अवस्था पुणे जिल्ह्यातील चिंकारा हरणांची झाली आहे. टणाटण उड्या मारत फिरणारी ही हरणे अशक्त झाली आहेत. त्यांच्या हालचाली मंदावल्यात. यंदाच्या या दुष्काळात वन्यजीवांना जगविण्याचे मोठे संकट वन खात्यावर कोसळले आहे.

जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर या डोंगराळ भागातील धरणे जेमतेम भरतील इतका पाऊस पडला. पण, इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्‍यांमध्ये पावसाच्या काही सरी पडल्या. याचा थेट फटका माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही बसत आहे. पाऊस पडला नसल्याने या भागात फारसे गवत उगवले नाही. पाण्याचे स्रोतच आटले. त्यामुळे या भागातील चिंकारा प्रकारच्या हरणांसह ससे, मोर असे तृणभक्ष्यी प्राण्यांना अन्न आणि पाण्यासाठी दूरदूरपर्यंत भटकावे लागत आहेत. त्यांच्यावर उपजीविका करणारे तरस आणि लांडगे यांच्याही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

या भागातील काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. माणसांना पिण्याचे पाणी दूरवरून आणावे लागत असताना वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करायचे कसे, हा मोठा प्रश्‍न वन खात्याला पडला आहे. यातून वन खात्याने कृत्रिम पाणथळीचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या वर्षापर्यंत बारामती, ताम्हिणी, दौंड आणि इंदापूर या वनपरिक्षेत्रात ४५ पाणथळ निर्माण केली होती. यंदाच्या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन, वन खात्याने त्यात यंदा नवीन पंधरा पाणथळ केली आहेत. त्यात टॅंकरने पाणी टाकून वन्य प्राण्यांना जगविण्याची कसरत वन खाते करत आहे. त्याच वेळी वनपरिक्षेत्रात गवत लावून चिंकारांना खाद्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील चिंकारांची संख्या 
इंदापूर     १५०० 
दौंड     १५०० 
बारामती     १००० 
(स्रोत - वन विभाग) 

गवत आणि पाणी नसल्याने चिंकारा अशक्त झाले आहेत. नेहमी प्रकर्षाने आपल्या डोळ्यांना दिसणारी त्यांची चपळता आता कमी झाली आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत त्यांना गवत आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पाणथळ निर्माण केली जात आहेत. गवताची कुरण तयार करण्यात येत आहे. पण, पुढील सहा महिने चिंकारांसाठी अतिशय आव्हानात्मक असणार आहेत.
- श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग

Web Title: Fodder Water Chinkara