नियम पाळा, गिफ्ट मिळवा; वाहतूक पोलिसांचा विशेष उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

वाहतूक पोलिस दररोज चौकाचौकात थांबून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या पावत्या फाडतात. त्यामुळे वाहतूक पोलिस पुणेकरांच्या टीकेचे धनी ठरले आहेत. पण, आता तुम्ही वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे पालन केले असेल, तुमच्या गाडीवर कुठल्याही प्रकारचा दंड नसेल, तर हेच वाहतूक पोलिस तुम्हाला मोबाईलवर "गिफ्ट कूपन' देऊन तुमचे कौतुक करणार आहेत.

पुणे - वाहतूक पोलिस दररोज चौकाचौकात थांबून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या पावत्या फाडतात. त्यामुळे वाहतूक पोलिस पुणेकरांच्या टीकेचे धनी ठरले आहेत. पण, आता तुम्ही वाहतुकीच्या सगळ्या नियमांचे पालन केले असेल, तुमच्या गाडीवर कुठल्याही प्रकारचा दंड नसेल, तर हेच वाहतूक पोलिस तुम्हाला मोबाईलवर "गिफ्ट कूपन' देऊन तुमचे कौतुक करणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या "आभार' या योजनेद्वारे आता पुणेकरांना कोणत्याही खरेदीसाठी दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात 135 व्यावसायिक सहभागी झाले आहेत. 

पुणेकरांना काहीसा दिलासा देणारी ही "आभार' योजना दोन दिवसांपासून शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास सुरवात झाली. दीड शेजणांना मोबाईलवर "गिफ्ट कूपन' कोड दिले आहेत. या योजनेची अधिकृत घोषणा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी गुरुवारी केली. या वेळी विविध कंपन्यांचे व्यावसायिक, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

"गिफ्ट कूपन' कोड, असा मिळेल 
वाहतूक पोलिसांनी एखाद्या वाहनचालकास पकडल्यास, संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी वाहतूक पोलिसांच्या मोबाईल ऍपवर संबंधित चालकाच्या वाहनावर नियमाचे उल्लंघन केल्याचा दंड आहे का? याची तपासणी करेल. दंड नसल्यास ते त्यांच्याकडील गिफ्ट कूपन ऍपवर चालकाचा मोबाईल क्रमांक टाकतील. त्यानंतर चालकांना मेसेजद्वारे "कूपन कोड' मिळेल. तो संबंधित व्यावसायिकांना दाखविल्यास किमान 100 रुपयांपर्यंत किंवा खरेदीच्या दहा टक्‍क्‍यांपर्यंत चालकांना सवलत मिळणार आहे. 

हॉटेल्स, मॉल्स आणि बरंच काही ! 
शहरातील नामांकित हॉटेल, रेस्टॉरंट, बिर्याणी हाउस, केकशॉप्स, मॉल्स, विविध वस्तू, कपडे, दागिने व अन्य सर्व प्रकारची दुकाने, व्यावसायिक अशा 135 जणांनी या योजनेत भाग घेतला आहे. हे कूपन एक महिन्यापर्यंत वापरता येणार आहे. 

वाहतूक पोलिस फक्त दंडाच्या पावत्या फाडतात, अशी चालकांची तक्रार असते. परंतु, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईशिवाय पर्याय नाही. परंतु अनेक चालक वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे नियमांचे पालन करतात. अशा चालकांचे कौतुक झालेच पाहिजे, म्हणूनच आम्ही "आभार' योजनेंतर्गत छोटीशी भेट देऊन चालकांना सन्मान करण्याचे ठरविले आहे. 
पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow the rules get a gift Transport Police Special Program