सिंहगड परिसरात वनविभागाची कारवाई शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड परिसरात वनविभागाची कारवाई : शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त

सिंहगड परिसरात वनविभागाची कारवाई : शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त

किरकटवाडी(पुणे) : सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाकडून कारवाई करण्यात आली असून दोन शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त करण्यात आला आहे. पहाटेच्या वेळी करण्यात आलेल्या या कारवाईत जनावरांच्या गोठ्यासह दैनंदिन संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करण्यात आली आहे. नियम मोडून बांधण्यात आलेले धनदांडग्यांचे अलिशान बंगले, फार्महाऊस, हॉटेल यांना सोडून गरिबांना कायदा दाखवला जात असल्याचा संताप संबंधित शेतकरी कुटुंबातील तरुण व महिलांनी व्यक्त केला आहे.

घेरा सिंहगड गट ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सांबरेवाडी येथे डोंगरात बबन मरगळे, धाकू मरगळे व इतर शेतकऱ्यांची वस्ती आहे. शासनाकडून अद्याप ये-जा करण्यासाठी रस्ता, वीज, पाणी अशी कोणतीच व्यवस्था येथे करण्यात आलेली नाही. आजूबाजूला पुर्ण जंगल असल्याने येथे हिंस्र जंगली प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून मरगळे बंधूंनी घरापासून दिड ते दोन किलोमीटर अंतरावर जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून लोकवस्ती जवळ जनावरांसाठी व राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार केला होता. पिकवलेले धान्य व इतर घरसामान त्यांनी येथे ठेवले होते. आज दि.25 नोव्हेंबर रोजी पहाटे अंधार असतानाच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह इतर चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही मरगळे बंधूंचे संसार उध्वस्त केले.

हेही वाचा: अहमदनगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी

संध्याकाळ पर्यंत सामान घेवून जा नाहीतर गाडीत भरुन घेऊन जाणार संपूर्ण निवारा भूईसपाट केल्यानंतर व घरातील भांड्यांची अक्षरशः मोडतोड केल्यानंतर उपस्थित असणाऱ्या वन अधिकाऱ्यांनी अस्ताव्यस्त व मोडतोड करण्यात आलेले घरसामान, धान्य संध्याकाळपर्यंत घेऊन जाण्याचा धमकीवजा इशारा दिला. जर साहित्य नेले नाही तर आम्ही संध्याकाळी गाडी भरुन घेऊन जाऊ असेही मरगळे यांना सुनावले. भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले.

"सगळं उघड्यावर आलंय. छताच्या पत्र्यांची मोडतोड केलीच पण घरातील भांडेही जेसीबीने फोडले. शेळ्या-गुरं आज बांधणार कुठं? सरकारी मदत मिळत नाही, आम्ही कष्टानी उभं केलेलं तोडताना आणि आमची लेकरं-बाळं उघड्यावर आणताना यांना काहीच कसं वाटत नाही."

- गंगुबाई बबन मरगळे, सांबरेवाडी, घेरा सिंहगड.

"परिसरात अनेक मोठे बंगले, हॉटेल, फार्महाऊस हे वन कायदे मोडून बांधण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करताना वन अधिकाऱ्यांना कशाची भिती वाटते? गरिबांना असे चिरडून कायदा दाखवताना अधिकारी दुटप्पी भूमिका का घेतात? आम्ही कसलेही पक्के बांधकाम केलेले नव्हते. आम्ही उलट झाडे लावून जगवली आहेत. अतिशय निर्दयीपणे आमच्या गोठ्याची व घरसामानाची नासधूस करण्यात आली."

- ज्ञानेश्वर धाकू मरगळे, तरुण दुग्ध व्यावसायिक, सांबरेवाडी.

"संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात आली होती व त्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. काही जीवनावश्यक साहित्य आम्ही बाजूला काढून ठेवले आहे. इतर अवैध अतिक्रमणांबाबत आमची शोधमोहीम सुरू आहे. योग्य पडताळणी करुन कारवाई करण्यात येत आहे. जेथे वन कायद्यांचा भंग झाल्याचे आढळेल तेथे कारवाई होईल."

- बाबासाहेब लटके, खानापूर वनपरिमंडळ अधिकारी.

loading image
go to top