esakal | साधना बॅंकेच्या माजी अध्यक्षांसह पत्नीला दरोडेखोरांची बेदम मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime

साधना बॅंकेच्या माजी अध्यक्षांसह पत्नीला दरोडेखोरांची बेदम मारहाण

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर (पुणे) : साधना सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुभाष काशिनाथ काळभोर (वय ७५) व त्यांच्या पत्नी कुसुम यांना चार ते पाच दरोडेखोरांनी बुधवारी (ता. १४) पहाटे घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. वरील दरोडेखोरांनी सुभाष काळभोर यांच्या प्रमाणेच लोणी काळभोर हद्दीत आणखी पाच ठिकाणी धुडगूस घातला. काळभोर यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेस अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी उलटूनही, लोणी काळभोर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

हेही वाचा: रेमडेसिविरच्या बाबतीत टास्क फोर्सच्या निर्देशांचे पालन करा : जिल्हाधिकारी

दरम्यान नागरीकांनी मदतीसाठी पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क केल्यास सात मिनिटांच्या आत पोलिस मदतीला येतील असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उरुळी कांचन येथे पाच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र काळभोर यांना मारहाण होऊन अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी उलटूनही लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काळभोर हे आपल्या कुंटुबासह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पांढरीमळा येथे राहतात. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घराचा दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी काळभोर व त्यांची पत्नी कुसुम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी चोरट्यांनी सुभाष काळभोर व त्यांच्या पत्नी कुसुम या दोघांनाही जबर मारहाण केली.

दोन चोरट्यांनी कुसुम यांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून घेतले. त्याचवेळी वरच्या मजल्यावर झोपलेले सुभाष काळभोर यांचा मुलगा नंदु काळभोर जागा झाला. नंदु काळभोर व त्यांची पत्नी खाली येत असल्याचे लक्षात येताच, चोरट्यांनी पळ काढला पण, त्याचदरम्यान नंदु काळभोर यांनी पळून जाणाऱ्या एका चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा नंदु यांच्या हाताला हिसका मारुन पळून गेला. या गडबडीत चोरट्याने ओरबडलेले कुसुम यांचे दागिने व चोरट्यांची काही हत्यारे दरवाज्यात पडल्याचे काळभोर यांना आढळून आले.

हेही वाचा: शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; गारांसह पावसाने लाखोंचे नुकसान

प्रसंग बिकट असल्याने सुभाष काळभोर यांनी तात्काळ पावणेचारच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर अर्धा तासानंतरही पोलिस येत नसल्याचे लक्षात आल्याने, काळभोर यांनी सव्वाचारच्या सुमारास शंभर नंबरवर फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मात्र दहा मनिटांत दोन पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले व माहिती घेऊन परत गेले. याबाबत अधिक बोलताना सुभाष काळभोर म्हणाले, ''बुधवारी पहाटे झालेल्या मारहाणीची माहिती देऊनही, लोणी काळभोर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. घटना घडल्यानंतर आलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी किरकोळ मारहाण झाल्याचे मलाच सांगून, गप्प राहण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: ससून 'व्हेंटिलेटरवर'; एकाच बेडवर होतायत तिघांवर उपचार

याबाबत बोलताना लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, ''राजेंद्र चौधरी यांच्या घरी झालेल्या चोरीचीच माहिती पोलिसांनी मला दिलेली आहे. मात्र सुभाष काळभोर व त्यांच्या पत्नीला झालेल्या मारहाणीची माहिती पोलिसांनी मला दिलेली नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. बुधवारी पहाटे ड्युटीवर कोणकोण होते व सुभाष काळभोर यांच्या घरी कोण कोण गेले होते व त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार का दाखल केली नाही याची माहिती पुढील काही घेणार आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.''