फडणवीस म्हणाले, '...तर मी आणि हर्षवर्धन पाटील माजी मंत्री नसतो!'

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

इंदापूर : 'इंदापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना 1500 मते जास्त दिली असती, तर आपण आणि हर्षवर्धन पाटील माजी मंत्री झालो नसतो, अशी भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इंदापूर कृषी महोत्सव 2020 अंतर्गत आयोजित पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचा समारोप समारंभात फडणवीस बोलत होते. शेतीविषयासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून शाश्वतशेती व्यवसायासाठी शेतकरी सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जलशक्ती मंत्रालय सुरू केले असून त्यामार्फत शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत असल्याने जलक्रांती अटळ आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी सक्षमीकरणाचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम नेत्रदीपक आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात कृषी प्रदर्शने भरतात. मात्र, आधुनिक शेती तंत्रज्ञान, डॉग शो आणि घोडे बाजार याबरोबरच संपूर्ण शेतकरी कुटुंबासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्ययात्रा यामुळे हे प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांना पर्वणी ठरले आहे. वातावरणातील दुष्परिणामामुळे शेतीवर अनिष्ट परिणाम होत असून अर्थकारण मजबूत होण्यासाठी शेतीत यशस्वी प्रयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही द्रोण तंत्रज्ञान सुरू केले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. 'जलयुक्त शिवार' हे अभियान लोक सहभागातून यशस्वी झाले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी 50 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले असून आम्ही 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

साखर न्यूनतम दरापेक्षा कमी दराने विकू नये, असा कायदा केल्याने कारखान्यांना एफआरपी देता आली. मात्र, सध्या सत्तेवर असलेले सरकार शेती, सहकार आणि शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही. विद्यमान सरकारचे बंगले, दालने, खाती आणि पालक मंत्रीपदाचे वाद सहा महिन्यात मिटणार नाही.  तसेच त्यांची कर्जमाफी सर्वसमावेशक नसल्याने फसवी आहे. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालेल तितके दिवस सक्षम विरोधक म्हणून काम करू. तर ज्यावेळी आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी आम्ही तुम्हा शेतकऱ्यांबरोबर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

तसेच 'आम्ही सत्तेचा घोडेबाजार केला नाही, त्यामुळे आम्ही विरोधात बसलो आहोत. मात्र, सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा फुगा लवकरच फुटेल,' असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, सलग 3 वर्ष कृषी प्रदर्शन घेऊन इंदापूर बाजार समितीने आपला ब्रँड तयार केला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले असून त्यांच्या शब्दाला मंत्रालयात महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या 14 मागण्या मंजूर करण्यासाठी तसेच शेतकरी निवास बांधण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये त्यांनी मिळवून द्यावेत. 

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, जालिंदर कामठे, पुष्पा रेडके, अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, रंजन तावरे, मंगेश पाटील, भरत शहा, नानासाहेब शेंडे, कृष्णाजी यादव, माऊली चवरे, तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर, तर आभार प्रदर्शन सचिन भाग्यवंत यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com