माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पुणेः पुण्याचे माजी महापौर व माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे अल्पशा आजाराने आज (शुक्रवार) सकाळी निधन झाले. ते वय 67 वर्षांचे होते. बोपोडी स्मशानभूमित आज दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पुणेः पुण्याचे माजी महापौर व माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे अल्पशा आजाराने आज (शुक्रवार) सकाळी निधन झाले. ते वय 67 वर्षांचे होते. बोपोडी स्मशानभूमित आज दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ऍड. छाजेड हे कॉंग्रेसमधील निष्ठावंत सैनिक होते. राजकीय क्षेत्रात मामू या नावाने ओळखले जात होते. काँग्रेस पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि अफाट लोकसंग्रहामुळे ते पाच वेळा महापालिकेवर निवडून आले होते. त्यांनी महापौर पद भूषवले होते, तसेच सभागृह नेता म्हणूनही त्यांनी महापालिकेत आपला ठसा उमटवला होता. सर्वांना सोबत घेऊन सभागृहात विषय मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. 1999 साली विधानसभा निवडणुकीत बोपोडी येथून ते विजयी झाले होते. आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली.

छाजेड 1971 पासून नागरी संरक्षण दलात कार्यरत होते. चीन युद्धात त्यांनी नागरी संरक्षण दलात काम केले होते. विभागीय क्षेत्ररक्षक, उपमुख्य क्षेत्ररक्षक, प्रभारी मुख्य क्षेत्ररक्षक आदी पदांवर काम केले होते. नागरी संरक्षण कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपतिपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर हे पारितोषिक मिळविणारे ते पहिलेच आमदार होते.

पुणे नागरी संरक्षण दलाच्या मुख्य क्षेत्ररक्षकपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या राज्य शाखेतर्फे आमदार चंद्रकांत छाजेड यांचा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन गौरव करण्यात होता. जालन्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Former minister Chandrakant Chajed dies