esakal | दुध आंदोलनात हर्षवर्धन पाटीलही उतरले
sakal

बोलून बातमी शोधा

harshwardhan patil

राज्यव्यापी दुध यल्गार आंदोलनाचा भाग म्हणून तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दुधाची किटली आणि निवेदन देण्यात आलं. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते.

दुध आंदोलनात हर्षवर्धन पाटीलही उतरले

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर - राज्यात दुधाच्या दरावरून आंदोलन सुरू झालं आहे. काही ठिकाणी या आंदोलनावेळी रस्त्यावर दूधही ओतल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, इंदापूर तालुक्यात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हेसुद्धा आंदोलनात उतरले आहेत. इंदापूर तालका भारतीय जनता पक्ष, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई आठवले गट यांच्यावतीने 1 ऑगस्टला होणाऱ्या राज्यव्यापी दुध यल्गार आंदोलनाचा भाग म्हणून तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दुधाची किटली आणि निवेदन देण्यात आलं. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते. 

गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर 10 रुपये, दुध पावडरला प्रति किलो 50 रूपये अनुदान द्यावे तसेच 30 रुपये प्रति लिटरने दूध खरेदी करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यातील शेतक-यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या संकटामध्ये शासनाकडून शेतक-यांना कोणतीही मदत नसल्याचेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हे वाचा - इंदापूरचे शेतकरी आक्रमक, रस्त्यावर ओतले दूध

सध्याच्या संकट काळात दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते त्यापैकी ३५ लाखलिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते तर ९० लाख लिटर दुध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वतः हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो तर शासकिय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते. कोरोना लॉकडाउनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली.सध्या खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रुपये दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुध्दा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रूपये प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुधखरेदी केले जात आहे. काही ठराविक दुध संघाकडूनच शासन दुध विकत घेत असून इतर शेतकरी व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे.

गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी करीता प्रति किलो ५० रूपये अनुदान, शासनाकडून ३० रूपये प्रति लिटरने दुधाची खरेदी या न्यायमागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करीत आहोत.शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक न्याय देणे गरजेचे आहे असंही या निवेदनात म्हटलं आहे. 

हे वाचा - पुण्यात नव्या निर्णयामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आणि कुटुंबांना  दिलासा

यावेळी भाजपा नेते माऊली चवरे, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, दुधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष उत्तम जाधव, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, आर.पी.आय आठवले गटाचे जिल्हा संघटन सचिव शिवाजी मखरे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, रासपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, मोटार वाहतूक संघाचेअध्यक्ष रघुनाथ राऊत, गटनेते कैलास कदम,भाजपा इंदापूर शहराध्यक्ष शकिल सय्यद, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, गोपीचंद गलांडे  उपस्थित होते.