हर्षवर्धन पाटील यांनी आकडेवारीने मांडले मंत्री भरणे यांच्या अपयशाचे गणित

डॉ. संदेश शहा
Monday, 7 September 2020

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील उपलब्ध तुटपुंज्या सुविधा पाहता चार महिन्यांपूर्वी आपण इंदापूर तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट होईल, असा जाहीर इशारा दिला होता. तसेच, सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी वैद्यकीय सुविधांची उपलब्धता करावी, अशी मागणी केली होती.

इंदापूर (पुणे) :  इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ११५० पर्यंत पोहचली असून, 46 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूचा दर २.५ ते ३ टक्क्यांच्या आत असताना इंदापूरात मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर 4 टक्के एवढा जास्त आहे. झालेल्या मृत्यूमध्ये केवळ ऑक्सीजन, व्हेंटिलेटर न मिळाल्याने सुमारे 30 ते 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याचे सिद्ध होते, असा आरोप भाजप नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील उपलब्ध तुटपुंज्या सुविधा पाहता चार महिन्यांपूर्वी आपण इंदापूर तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट होईल, असा जाहीर इशारा दिला होता. तसेच, सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी वैद्यकीय सुविधांची उपलब्धता करावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन नियोजन झाले असते, तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या निश्चित कमी झाली असती. सध्याच्या लोकप्रतिनिधींना परिस्थितीचे गांभीर्य व जबाबदारीची जाणीव नाही. इतर तालुक्यात कोरोना रूग्णांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत, मात्र इंदापूर तालुका मंत्रीपद असूनही चांगल्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, जनता भयभीत झाली आहे. 

मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय, तेच उगवलंय

ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड आरोग्य सुविधा सरकारकडून मिळत नाहीत, तर बाहेरच्या शहरातही रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. इंदापूर तालुक्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय साधने, डॉक्टर व स्टाफची टंचाई, रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांना होणारा त्रास, याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही, असे पाटील म्हणाले.

आम्ही राजकारण करत नसून, वस्तुस्थिती मांडत आहे. या स्थितीमुळे जनतेचा शासन, प्रशासनावर विश्वास राहिला नाही. जनतेने या महामारीपासून आपला बचाव करण्यासाठी शासन निर्देशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
 - हर्षवर्धन पाटील, भाजप नेते
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Minister Harshvardhan Patil's criticism of Minister Dattatreya Bharane