मुख्यमंत्री जरा डोळे उघडा अन् मातोश्रीच्या बाहेर पडा..राजू शेटी यांची टीका 

मिलिंद संगई
Thursday, 27 August 2020

बारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून शेट्टी यांनी आपला निषेध नोंदविला. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

बारामती (पुणे) : मुख्यमंत्री जरा डोळे उघडा...मातोश्रीच्या बाहेर पडा, आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा...अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत ते बघा....यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत, तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ....असे सुरु आहे, अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांना बारामतीत लक्ष्य केले. 

टेमघर धरणाची पाणीगळती 96 टक्के रोखण्यात यश

बारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून शेट्टी यांनी आपला निषेध नोंदविला. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, अनेक दूध संघ कागदावरचे असून, यांचे लेखापरिक्षण करावे, मी आव्हान देऊन सांगतो, 6 एप्रिलपूर्वी यांच्या डेअरित दूध किती होते, ते दाखवावे. 18 रुपयांनी अगदी परराज्यातूनही दूध विकत घेऊन सरकारला ते 25 रुपये लिटरने विकले आहे. सरकारी दूधखरेदी योजना सुरु झाल्यावरच यांचे दूध कसे वाढले, कागदी मेळ करुन सरकारी तिजोरी लुटण्याचे काम झालेले आहे. यात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. हे सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर उघड्या डोळ्याने पाहत असतील, तर उध्दवसाहेब दूध उत्पादकांनी हातात लोढण का घेऊ नये, याचे उत्तर तुम्ही मला द्या. 

पुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण

सरकारी खरेदी होऊनही दूधाचे भाव वाढत नसल्याने ही उत्पादकांची फसवणूकच असल्याचा गंभीर आरोप करत शेट्टी यांनी विविध ठिकाणच्या दूध संघांनी दिलेल्या भावांची आकडेवारीच वाचून दाखवली. गोमूत्र व शेणालाही दूधापेक्षा अधिक दर मिळतो, पाण्याची बाटलीही दूधापेक्षा महाग आहे, ही बाब राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी, अशी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अनेक जण दूध उत्पादकांच्या नावाने दरोडेखोरी करीत आहेत, दूध उत्पादकांच्या हक्काचा पैसा लुटला जात असल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचे शेट्टी म्हणाले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनीही सविस्तर आकडेवारी मांडून दूध उत्पादकांना पाच रुपयांचे अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगितले. शांततेच्या मार्गाने बारामतीत येऊन आम्ही घामाचा दाम मागतोय, वेळ पडली तर जहाल आंदोलन उभे करु, असा इशारा त्यांनी दिला. दशरथ राऊत यांनीही या प्रसंगी आपल्या व्यथा मांडल्या. युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनीही आत वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु, असा इशारा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MP Raju Shetty criticizes Chief Minister Uddhav Thackeray