पुण्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा असा ठरणार फाॅर्म्यूला

भरत पचंगे
Friday, 17 July 2020

पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींपैकी कोणती ग्रामपंचायत कुण्या पक्षासाठी हे निश्चित करण्याचे महत्वाचे काम महाविकासआघाडीतील तीनही पक्ष सोमवारी (ता. २०) फायनल करणार असून,

शिक्रापूर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींपैकी कोणती ग्रामपंचायत कुण्या पक्षासाठी हे निश्चित करण्याचे महत्वाचे काम महाविकासआघाडीतील तीनही पक्ष सोमवारी (ता. २०) फायनल करणार असून, त्यानंतर ज्या- त्या जिल्हाध्यक्षाने आपापले प्रशासक नावे अंतिम करण्याचे काम २५ जुलै रोजी पूर्ण करण्याचे ठरले आहे. याबाबत तीनही जिल्हाध्यक्षांची बैठक काल झाली.

 पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठी एवढा निधी मंजूर

आरक्षणाप्रमाणे नाही तर खुल्या पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासकांची यादी बनविण्याचे काम पुणे जिल्ह्यातील महाआघाडीतील तीनही पक्षांकडून सुरू असून, सोमवारी (ता. २०) पक्षनिहाय ग्रामपंचायत यादी निश्चित करण्याची पहिली बैठक निश्चित केली आहे. पहिल्यांदा ग्रामपंचायत निश्चिती, त्यानंतर प्रशासक नावे निश्चिती आणि त्यानंतर प्रशासक यादी पालकमंत्र्यांकरवी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिली जाणार आहे. त्यानंतर तत्काळ प्रशासक नेमणुकीची तयारी तीनही पक्षांकडून सुरू आहे. ३० जुलैअखेर जिल्ह्यातील ७५० प्रशासकांच्या नियुक्ती करण्याची तयारी सुरू आहे. 

काय सांगता, पुणे झेडपीला डाॅक्टर आणि नर्स मिळेना...

दररोज नवनवीन शासन आदेश आणि सोशल मिडियातील चर्चांमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीचा गदारोळ प्रत्येक गावात सुरू आहे. एकेका गावात दहा ते ३० एवढ्या मोठ्या संख्येने प्रशासकपदी इच्छुकांचे अर्ज पक्षनिहाय तालुकाध्यक्षांकडे जमा होत आहेत. कार्यकर्त्यांच्या मोठ्या अपेक्षा, स्थानिक गटबाजीमुळे एकमेकांवरील कुरघोडीच्या प्रकाराने तालुकाध्यक्षांनाही याचा त्रास होत आहे. मात्र, हे प्रकरण लवकर मिटून एकदाच्या काय त्या नियुक्त्या व्हाव्यात म्हणून पक्षपातळीवरुनही मोठा दबाव जिल्हाध्यक्षांवर आहे. 

या पार्श्वभूमिवर पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्तीबाबतच्या विषयासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप, शिवसेनेचे रमेश कोंडे व माउली कटके यांनी एकत्रित बैठक केली व त्यानुसार येत्या सोमवारी कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाकडे, याचा निर्णय होणार आहे. त्यातील पक्षनिहाय ग्रामपंचायतीची निवड झाल्यावर मग पुढील तीन दिवसात सलगपणे बैठका घेऊन २५ रोजी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रशासकांच्या नावांची यादी बनविण्याचे काम अंतिम होणार आहे. या माहितीला माउली कटके यांनी दुजोरा दिला. 

प्रशासक यादी फायनल करून पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. प्रशासकीय प्रक्रीया म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ती दिली जाणार असून, त्यानंतर ३० जुलैअखेर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जातील, असे या घडामोडींमध्ये सक्रीय असलेल्या जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिका-याकडून सांगण्यात आले.
 
Edited By : Nilesh J Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The formula for appointing administrators to Gram Panchayats will be decided as follows