काय सांगता! पुणे झेडपीला डाॅक्टर्स अन् नर्स मिळेनात!

गजेंद्र बडे
Friday, 17 July 2020

ही सर्व पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेला कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका (स्टाफ नर्स) मिळेनासे झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाचे वाढते संकट रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. डॉक्टर आणि नर्सच नसतील, तर रुग्णांवर उपचार करणार कोण? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिंकांसह तब्बल १४८९ रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेने इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त २०४ जागांसाठी अवघ्या १५ जणांनी, परिचारिकांच्या ७०१ जागांसाठी ५८५ जणींनी, ई.सी.जी. तंत्रज्ञांच्या २७ जागांसाठी केवळ सात तर, फिजिशियनच्या (औषध सल्लागार) १३ जागांसाठी केवळ चार जणांनी अर्ज केले आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागातील विविध संवर्गातील १ हजार ४८९ रिक्त जागा मानधन किंवा मेहनताना तत्वांवर तत्काळ भरण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. यानुसार जंबो जाहिरात देऊन, यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी १५ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली होती. या तारखेपर्यंत सर्व रिक्त जागांसाठी मिळून सात हजार ८८० अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वॉर्डबॉय या पदासाठी दोन हजार २६८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त

या रिक्त पदांमध्ये गॅस्ट्रोएन्ट्रोलाॅजिस्ट, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, रुग्णालय व्यस्थापक, सहअधिसेविका, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता, क्ष- किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ब्लॉक समुदाय व्यवस्थापक,  तालुका हिशोबनीस, वॉर्डबॉय, बेडसाईड असिस्टंट, रिशेप्सनिष्ट आदींचा समावेश आहे.

ही सर्व पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. 

यासाठी दहावी, बारावी उत्तीर्ण, वाणिज्य पदवीधारक, पदवीधर, बी. फार्मसी, डीएमएलटी, जी.एन.एम किंवा बी एस्सी (नर्सिंग), बी. ए. एम. एस., बी. एच. एम‌ एस., बी. यु. एम. एस., 
एम. एस्सी. (नर्सिंग), एम. बी.बी. एस., एम. डी. आदी प्रकारची पदनिहाय वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

मुंबईत नव्हे, पुण्यात आहे, कोरोनाची चिंताजनक स्थिती; एकेका बेडसाठी लागल्या रांगा​

सर्वाधिक पदनिहाय रिक्त जागा 

- वैद्यकीय अधिकारी - २०४.

- स्टाफ नर्स (परिचारिका) - ७०१.

- वॉर्डबॉय - २००.

- बेडसाईड असिस्टंट - २००.

- प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ३८.

- ईसीजी तंत्रज्ञ - २७.

- क्ष-किरण तंत्रज्ञ - २४.

- आयुष वैद्यकीय अधिकारी - १४.

- रुग्णालय व्यवस्थापक - २९.

- औषधनिर्माता - ११.

- भूलतज्ज्ञ - १७.

- फिजिशियन - १३.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune ZP didnt got the medical officers and nurses required for corona prevention