esakal | अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या चौघांना अटक; आरोपींमध्ये दोन भावांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Child_Kidnapping

सदर मुली कोठे गेल्या याबाबत खात्रीशीर माहिती नसताना गुंड यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस पथक पालघर येथे तपासासाठी पाठवले होते. नारायणगाव पोलिसांनी मोखाडा येथील दुर्गम भागातून मुलींसह आरोपी वाघ आणि शुभम गाडेकर यांना ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या चौघांना अटक; आरोपींमध्ये दोन भावांचा समावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : खोडद (ता.जुन्नर) येथील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असून आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमा अन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

या प्रकरणी शुभम प्रकाश गाडेकर (वय २१), प्रकाश विठोबा गाडेकर (वय ५६), रोहिदास विठोबा गाडेकर (वय ५०, सर्व रा. माळवाडी, खोडद, ता. जुन्नर), प्रवीण लक्ष्मण वाघ (वय १८, रा.ओझर, ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक) यांना अटक केली असून आरोपींना जुन्नर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती गुंड यांनी दिली.

महिनाभरानंतरही गौतम पाषाणकरांचा ठावठिकाणा नाही; राजकीय व्यक्तीचं नाव गुलदस्त्यात​

आरोपी शुभम गाडेकर आणि प्रवीण वाघ यांची या मुलींशी ओळख होती. ते सध्या मोखाडा (जि. पालघर) येथे वास्तव्यास होते. शुभम गाडेकर याचे वडील प्रकाश गाडेकर आणि चुलते रोहिदास गाडेकर यांनी दोन्ही मुलींना १६ नोव्हेंबर २०२० रोजी आळेफाटा (ता.जुन्नर) येथून एसटी बसमध्ये बसवून मोखाडा येथे पाठवून दिले. त्यानंतर या मुली शुभम गाडेकर आणि प्रवीण वाघ यांचे समवेत वास्तव्यास होत्या. मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

सदर मुली कोठे गेल्या याबाबत खात्रीशीर माहिती नसताना गुंड यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस पथक पालघर येथे तपासासाठी पाठवले होते. नारायणगाव पोलिसांनी मोखाडा येथील दुर्गम भागातून मुलींसह आरोपी वाघ आणि शुभम गाडेकर यांना ताब्यात घेतले. दोन्ही मुलींना पालकांच्या ताब्यात दिले आहे. तपासात मुलींना पळवून नेण्यास प्रकाश गाडेकर आणि रोहिदास गाडेकर या दोन भावांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. यावरून चारही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती गुंड यांनी दिली.

मोबाईल नेटवर्कचे बेसबॅंड चोरणाऱ्यांना पोलिसांनी केलं जेरबंद; ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त​

गुंड म्हणाले, 'अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढत आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, पाठलाग करणे, विनयभंग करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामध्ये भा. द. वि. कलम ३५४(अ) (ड) सह कलम ८,१२ पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला जातो. या गुन्ह्यात आरोपीला पाच ते दहा वर्षे शिक्षा होऊ शकते.'

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top